हप्ता खात्यात जमा; वाळूच नाही, साडेसात हजार घरकुलांचे बांधकाम रखडले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 15, 2026

हप्ता खात्यात जमा; वाळूच नाही, साडेसात हजार घरकुलांचे बांधकाम रखडले

हप्ता खात्यात जमा; वाळूच नाही, साडेसात हजार घरकुलांचे बांधकाम रखडले


सोलापूर (कटूसत्य वृत्त) : ग्रामीण भागातील घरकूल लाभार्थ्यांच्या बँक खात्यात शासनाकडून घरकूल योजनेचे हप्ते जमा होत असले तरी बांधकामासाठी आवश्यक असलेल्या मोफत वाळूच्या पुरवठ्याचा प्रश्न अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. शासनाने पाच ब्रास मोफत वाळू देण्याची तरतूद केली असली तरी प्रत्यक्षात वाळू उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील सुमारे साडेसात हजार घरकुलांचे बांधकाम रखडल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

शासनाकडून घरकूल मंजूर झाल्यानंतर अनेक लाभार्थ्यांनी आपल्या स्वप्नातील घराचे बांधकाम सुरू केले आहे. अनुदानाचे हप्तेही टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहेत. मात्र, बांधकामासाठी आवश्यक असलेली वाळू उपलब्ध होत नसल्याने कामाचा वेग मंदावला असून अनेक ठिकाणी बांधकामे अर्धवट अवस्थेत आहेत.

दक्षिण सोलापूर तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागांतून मोफत वाळू मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. काही लाभार्थ्यांना खासगी विक्रेत्यांकडून वाळू खरेदी करावी लागत असल्याने अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. त्यामुळे घरकुलांचे अंदाजपत्रक कोलमडत असल्याचेही सांगितले जात आहे.

शासनाची घरकूल योजना ही केवळ आर्थिक मदत देण्यापुरती मर्यादित नसून लाभार्थ्यांना प्रत्यक्ष घर उभारता यावे हा तिचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे हप्त्यांसोबतच बांधकामासाठी आवश्यक साहित्य वेळेत उपलब्ध होणेही तितकेच महत्त्वाचे मानले जात आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाळूचा पुरवठा होत नसल्याने लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

चौकट

वाळूच्या तक्रारींची माहिती घेणार : सीईओ

जिल्ह्यातील ७ हजार ७५६ घरकूल लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ३३ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अपूर्ण घरकूल बांधकामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, वाळू उपलब्ध नसल्याच्या तक्रारींबाबत तालुकास्तरावरून माहिती घेण्यात येणार असून त्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages