रंगभवन चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन; शिवरायांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त संभाजी आरमारच्या वतीने रंगभवन चौक येथे शिवरायांच्या मूर्तीस अभिवादन करण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी शिवरायांच्या कार्याचा गौरव करत स्वराज्य आणि राष्ट्रभावनेचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे आणि कार्याध्यक्ष तथा नगरसेवक शिवाजी वाघमोडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर संघटनेचे सरचिटणीस गजानन जमदाडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, प्रदेश संघटक प्रकाश डांगे, शहरप्रमुख सागर ढगे, जिल्हा संघटक अमित कदम, अर्जुन शिवसिंगवाले आदींसह उपस्थित शिवप्रेमींनी दिलेल्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
यावेळी बोलताना श्रीकांत डांगे म्हणाले, “६ जून १६७४ रोजी झालेला शिवराज्याभिषेक हा भारतीय इतिहासातील अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे. परकीय सत्तेच्या जोखडाखाली असलेल्या जनतेमध्ये स्वराज्य, स्वाभिमान आणि राष्ट्रभावनेची ज्योत प्रज्वलित करण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. स्वतःचे राज्य, स्वतंत्र चलन, सक्षम प्रशासन व्यवस्था आणि मराठी भाषेला दिलेले महत्त्व यामुळे स्वराज्याची भक्कम पायाभरणी झाली. शिवराज्याभिषेक हा भारतीय राष्ट्रभावनेचा पाया ठरला आहे.”
कार्यक्रमादरम्यान शिवरायांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या प्रसंगी शहर संघटक राज जगताप, रेवण कोळी, महिला आघाडीच्या शहरप्रमुख संध्या हेब्बाळकर, जिल्हा संघटक अॅड. गीता पवार, उमा रजपूत, शोभा घंटे, जान्हवी पतंगे, कोमल कोलकुंदी यांच्यासह संभाजी आरमारचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment