बार्शीचा पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिकांत तीव्र संताप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 8, 2026

बार्शीचा पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिकांत तीव्र संताप

 बार्शीचा पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिकांत तीव्र संताप

दहा-बारा दिवसांपासून अनेक भागांत पाणी नाही; प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह




बार्शी (कटूसत्य वृत्त) : शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचे नियोजन कोलमडल्याने बार्शीकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील दहा ते बारा दिवसांपासून अनेक भागांत नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. बहुतांश नागरिकांना खासगी टँकरद्वारे पाणी खरेदी करून दैनंदिन गरजा भागवाव्या लागत आहेत.

नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे जलदाय अभियंता अजय होणखांबे यांच्याकडूनही पाणी समस्येबाबत नागरिकांना समाधानकारक स्पष्टीकरण मिळत नसल्याची तक्रार होत आहे. गेल्या चार महिन्यांपासून शहरात अनियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला असून त्यावर अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.

या पार्श्वभूमीवर आमदार दिलीप सोपल यांनी मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांना पत्र देऊन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नगर परिषदेकडून पाइपलाइन दुरुस्ती, नादुरुस्त लाईन, वीज गळती अथवा इतर तांत्रिक कारणे पुढे केली जात असली तरी ही कारणे कायमस्वरूपी असू शकत नाहीत. नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

ज्या भागांत पाणी पोहोचत नाही किंवा अत्यल्प प्रमाणात मिळत आहे, त्या भागांमध्ये तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणीही आमदार सोपल यांनी केली आहे.

पाणीपट्टीची वसुली नियमित, सेवा मात्र विस्कळीत

नगरपालिकेकडून दरवर्षी नागरिकांकडून पाणीपट्टीची वसुली नियमितपणे केली जाते. यंदाही पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे. मात्र, त्यानुसार दर्जेदार व नियमित सेवा मिळत नसल्याने नागरिक प्रशासनाला जाब विचारत आहेत.

टंचाईच्या काळातही टँकरची अपुरी व्यवस्था

बार्शी नगरपालिकेकडून कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी वसूल केली जाते. मात्र, टंचाईच्या काळात नागरिकांसाठी पुरेशा प्रमाणात टँकरची व्यवस्था करण्यात येत नसल्याचा आरोप होत आहे. विरोधी पक्षनेते अॅड. नागेश अक्कलकोटे यांनीही प्रशासनाला धारेवर धरत, नागरिकांना टँकरद्वारे पुरेसा पाणीपुरवठा का केला जात नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान, पाणीटंचाईची समस्या तातडीने सोडवून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा नागरिकांचा रोष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages