जय शिवराय प्रतिष्ठानचा १५ वा वर्षीही प्रेरणादायी उपक्रम; बारकुल कुटुंबाला आर्थिक मदत
बार्शी (कटूसत्य वृत्त) : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त बार्शी येथील जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने सलग १५ व्या वर्षी भव्य जलाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विविध पवित्र नद्यांचे जल आणून अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार मावळ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस जलाभिषेक करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात करण्यात आली. यानंतर उपस्थितांना मिठाईचे वाटप करून राज्याभिषेक दिनाचा आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी सामाजिक क्षेत्रात आणि जय शिवराय प्रतिष्ठानमध्ये सक्रिय योगदान देणारे स्वर्गीय बाबासाहेब बारकुल यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या निधनानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने ‘कर्तव्य मदत निधी’ अंतर्गत १ लाख ३७ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते हा निधी बारकुल कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला.
कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती मीनाक्षी रोंगे, नगरसेवक विजय राऊत, संदेश काकडे, दीपक राऊत, मदन गव्हाणे, मराठा सेवा संघाचे संतोष मोळवणे, प्रा. किरण गाढवे, छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील, जय शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय राऊत तसेच मराठा सेवा संघ आणि विविध शिवप्रेमी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून शिवरायांच्या विचारांचे जतन, सामाजिक बांधिलकी आणि समाजातील गरजू कुटुंबांना मदतीचा हात देण्याचा संदेश देण्यात आला.
No comments:
Post a Comment