शक्तिपीठ महामार्गाचा ट्रंपेट वैरागबाहेर घेण्याची मागणी
बाजारपेठ, घरे व स्मशानभूमी बाधित होण्याची भीती; आंदोलनाचा इशारा
वैराग (कटूसत्य वृत्त) : प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाचा ट्रंपेट (जंक्शन) वैराग शहरातून प्रस्तावित करण्यात आल्याने ग्रामस्थ, व्यापारी आणि नगरपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या ट्रंपेटमुळे शहराचा विस्तारित भाग, मोठी बाजारपेठ तसेच अनेक घरे बाधित होण्याची शक्यता असल्याने तो तातडीने नगरपंचायत हद्दीबाहेर स्थलांतरित करावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात वैराग येथे नागरिक, व्यापारी, लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत शक्तिपीठ महामार्गाच्या आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्या नागपूर-गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग वैराग नगरपंचायत हद्दीतून जात असून त्याचा ट्रंपेटही शहरालगत प्रस्तावित करण्यात आला आहे.
बैठकीत उपस्थितांनी सांगितले की, यापूर्वी सूरत-चेन्नई महामार्ग वैराग शहरापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावरून गेला असून त्याचाही ट्रंपेट परिसरातच उभारण्यात आला आहे. आता शक्तिपीठ महामार्गाचाही ट्रंपेट शहरातूनच झाल्यास सुमारे ४० ते ४५ हजार नागरिकांवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
या प्रकल्पामुळे वैरागच्या विस्तारित भागातील मोठी बाजारपेठ बाधित होण्याची शक्यता असून अनेक व्यापाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच मुस्लीम कब्रस्तान, हिंदू स्मशानभूमी, नगरपंचायत हद्दीतील यलो झोन, कमर्शिअल झोन आणि अनेक नागरिकांची घरेही या प्रकल्पाच्या कक्षेत येण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
ट्रंपेटमुळे वैराग शहराच्या भविष्यातील विकासालाही मोठा फटका बसू शकतो. शहर विस्ताराच्या संधी मर्यादित होतील तसेच नागरी विकासाला अडथळे निर्माण होतील, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. त्यामुळे ट्रंपेटचे नियोजन बदलून तो वैराग नगरपंचायत हद्दीबाहेर नेण्यात यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
यावेळी वैराग नगरपंचायतीचे उपाध्यक्ष निरंजन भूमकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती मकरंद निंबाळकर तसेच सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खेंदाड यांनी ट्रंपेटचे नियोजन तातडीने बदलण्यात यावे, अन्यथा तीव्र लोकआंदोलन उभारले जाईल, असा इशारा दिला. या मागणीसंदर्भात शासनाकडे निवेदन पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment