मोहोळ (कटूसत्य वृत्त): डॉक्टर किंवा रुग्णालयाने लिहून दिलेली औषधे रुग्णांना कोणत्याही शासनमान्य परवानाधारक मेडिकल स्टोअरमधून खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. विशिष्ट मेडिकल स्टोअरमधूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती डॉक्टर, दवाखाना किंवा रुग्णालय करू शकत नाही, असे स्पष्ट निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाने दिले आहेत.
रुग्णांमध्ये जनजागृती व्हावी आणि त्यांच्या हक्कांची माहिती मिळावी यासाठी सर्व रुग्णालये, दवाखाने आणि आरोग्य संस्थांमध्ये यासंदर्भातील माहिती फलक ठळकपणे लावण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. रुग्णांनी आपल्या सोयीनुसार आणि विश्वासार्ह परवानाधारक मेडिकल स्टोअरमधून औषधे खरेदी करावीत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
औषधे खरेदी करताना त्यावरील कालबाह्यता दिनांक (एक्सपायरी डेट), बॅच क्रमांक, कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) तसेच पॅकिंगची स्थिती तपासूनच औषधे घ्यावीत. याशिवाय औषधाचे बिल घेणे अत्यंत महत्त्वाचे असून भविष्यात तक्रार करावयाची असल्यास त्याचा उपयोग होतो, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
औषध विक्रीमध्ये सक्ती, गैरप्रकार किंवा नियमभंग आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
खासगी रुग्णालयांतील औषध खरेदीबाबत प्रश्नचिन्ह
अनेक खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना संबंधित रुग्णालयातील मेडिकल स्टोअरमधूनच औषधे खरेदी करण्यास सांगितले जाते. अनेकदा गरजेपेक्षा अधिक औषधे लिहून दिली जात असल्याची तक्रारही नागरिकांकडून केली जाते. जागरूक नागरिक आवश्यक तेवढीच औषधे खरेदी करतात किंवा शिल्लक औषधे परत करतात. मात्र अनेक वेळा औषधे वापरात न आल्याने ती वाया जातात आणि रुग्णांचा आर्थिक तोटाही होतो.
धडक कारवाईमुळे गैरप्रकारांवर आळा
अन्न व औषध प्रशासनाचा कार्यभार आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर विभागाकडून अन्नपदार्थ, हॉटेल, दूध डेअरी, आईस्क्रीम पार्लर, हॉस्पिटल, मेडिकल स्टोअर्स तसेच गुटखा, मावा आणि पानमसाला विक्रीविरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवायांमुळे अनेक गैरप्रकारांवर आळा बसल्याचा दावा केला जात असून नागरिकांना अधिक सुरक्षित व दर्जेदार खाद्यपदार्थ आणि औषध सेवा उपलब्ध होत असल्याचे सांगितले जात आहे.

No comments:
Post a Comment