अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) : राज्यातील बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधातील विशेष मोहिमेचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, केवळ १५ दिवसांत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) उत्पन्नात तब्बल ४३ कोटी ८३ लाख रुपयांची वाढ झाली आहे.
परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनुसार तसेच औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यभरातील बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी प्रियांका नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू आहे.
१ ते १५ जून या कालावधीत एसटी महामंडळाचे एकूण वाहतूक उत्पन्न ४९५ कोटी ३४ लाख रुपये इतके नोंदविण्यात आले. मागील वर्षीच्या याच कालावधीत हे उत्पन्न ४५१ कोटी ५१ लाख रुपये होते. त्याच्या तुलनेत यंदा ४३ कोटी ८३ लाख रुपयांची म्हणजेच ९.७१ टक्के वाढ झाली आहे. यामुळे एसटीच्या दररोजच्या सरासरी उत्पन्नात सुमारे ३ कोटी रुपयांची भर पडली आहे.
या कालावधीत रायगड विभागाने २ कोटी १७ लाख, पुणे विभागाने ५ कोटी ९७ लाख, सातारा विभागाने ३ कोटी ४६ लाख, छत्रपती संभाजीनगर विभागाने २ कोटी ६६ लाख, अमरावती विभागाने १ कोटी ६० लाख तर नांदेड विभागाने २ कोटी २७ लाख रुपयांची उत्पन्नवाढ नोंदवली आहे.
बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटीच्या प्रवासी संख्येवर आणि महसुलावर मोठा परिणाम होत होता. न्यायालयाच्या आदेशानुसार बसस्थानकापासून २०० मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिवहन विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस प्रशासन आणि एसटी महामंडळ यांच्या संयुक्त कारवाईमुळे प्रवाशांचा एसटीकडे ओढा वाढला असून त्याचे प्रतिबिंब उत्पन्नवाढीत स्पष्टपणे दिसून येत आहे.
राज्यातील सर्व बसस्थानक परिसर अवैध प्रवासी वाहतुकीपासून मुक्त करण्यासाठी ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे. एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि कायदेशीर सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्राधान्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
No comments:
Post a Comment