अखेर पुरंदर तालुक्यातील पिंपरे खुर्द येथे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना मंजुरीच्या मार्गावर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 9, 2026

अखेर पुरंदर तालुक्यातील पिंपरे खुर्द येथे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना मंजुरीच्या मार्गावर

 अखेर पुरंदर तालुक्यातील पिंपरे खुर्द येथे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना मंजुरीच्या मार्गावर





दौंड(कटूसत्य वृत्त):- पुरंदर तालुक्यातील मौजे पिंपरे खुर्द येथील भटक्या व विमुक्त जाती-जमाती घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेला अखेर गती मिळाली असून, या योजनेच्या कायदेशीर प्रस्तावास प्रशासकीय स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने लाभार्थी कुटुंबांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या व विमुक्त जाती-जमाती समाजाला मूलभूत सुविधा, सुरक्षित निवारा आणि सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार मिळावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ही लोककल्याणकारी योजना लागू केली आहे. पुरंदर तालुक्यातील पिंपरे खुर्द येथील भटक्या-विमुक्त बांधवांनी एकत्रित येऊन या योजनेसाठी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता.
     या संपूर्ण प्रक्रियेत माजी आमदार संजय जगताप, जय भैरवनाथ सामाजिक सेवाभावी संस्था, महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष विजय सुदामराव जाधव, तसेच समन्वयक दशरथ माळी यांनी विशेष पुढाकार घेत शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न केले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, पंचायत समिती पुरंदर, गटविकास अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत पिंपरे खुर्द, ग्रामसेविका चव्हाण मॅडम, सरपंच श्री. गायकवाड तसेच ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे या योजनेचा प्रस्ताव यशस्वीपणे पूर्णत्वास नेण्यात आला.
      योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने विविध स्तरांवर आवश्यक परिपत्रके काढून संबंधित विभागांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर पुरंदर तालुक्यातील हा प्रकल्प आदर्श ठरावा यासाठी विविध प्रशासकीय विभागांनी समन्वय साधून काम केले. यासंदर्भातील अंतिम कायदेशीर प्रस्ताव जय भैरवनाथ सामाजिक सेवाभावी संस्था, महाराष्ट्र यांचे संस्थापक अध्यक्ष विजय सुदामराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने इतर मागास बहुजन कल्याण विभाग, पुणे येथे सादर केला. यावेळी विभागाच्या मार्गदर्शनाखाली मा. जयवंत इंगळे यांनी संबंधित प्रस्ताव स्वीकारला व पुढील प्रशासकीय कार्यवाहीबाबत आवश्यक मार्गदर्शन केले. शासनाच्या नियमानुसार पुढील प्रक्रिया पूर्ण करून लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रशासन सकारात्मक असून, लवकरच या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
       पिंपरे खुर्द येथील भटक्या-विमुक्त समाजाच्या दृष्टीने हा ऐतिहासिक टप्पा मानला जात असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. या यशाबद्दल स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि लाभार्थी कुटुंबांनी समाधान व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages