शिक्षकाची सेवानिवृत्ती : थांबा नव्हे, नवी सुरुवात
३१ मे रोजी शासनाच्या विविध कार्यालयांतील अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले. तृतीय श्रेणीतील कर्मचारी ५८ वर्षे पूर्ण झाल्यामुळे, तर चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी वयाची साठी पूर्ण झाल्यामुळे सेवामुक्त झाले. अनेकांनी अश्रूनयनांनी आपल्या सहकाऱ्यांचा आणि कार्यालयाचा निरोप घेतला. हा दिवस भावनांनी ओथंबलेला होता. सेवानिवृत्त होणाऱ्यांचे मन दाटून आले होते. निरोप देणे नकोसे झाले होते. मनातील भावनांना वाट मोकळी करून देताना अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला.
माणसाचे जीवन हे गतिशील असते. या गतिशील जीवनात स्थैर्य आणि शिस्त येते ती नोकरीमुळे. नोकरीत कर्मचारी इतका गुरफटून जातो की, दररोजचे कार्यालयीन कामकाजच त्याचे जीवन बनून जाते. त्यातूनच तो स्वतःची ओळख निर्माण करतो. जीवनातील ३० ते ३५ वर्षे एखाद्या शासकीय कार्यालयात कशी भराभर निघून जातात, हे त्यालाही कळत नाही.
शिक्षकांसाठी तर सेवानिवृत्ती म्हणजे भरल्या घरातून निघून जाण्यासारखी असते. शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी, त्यांचे भावविश्व, त्यांचे हसरे चेहरे आणि त्यांच्याशी होणारा आदरयुक्त संवाद यापासून आता दूर व्हावे लागणार असते. विद्यार्थी घडवता घडवता स्वतःचे जीवन समृद्ध करून घेणारा शिक्षक आता त्या विद्यार्थीप्रेमाला मुकणार असतो.
अध्ययन-अध्यापन ही एक प्रयोगशील प्रक्रिया आहे. इतर कामकाजांच्या तुलनेत येथे नावीन्य, सर्जनशीलता आणि कलात्मकता जपण्याची मोठी संधी असते. शिक्षकांचा प्रत्येक दिवस नवीन असतो. आपल्यापेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची बोलण्यातील चपळता, निरागसता आणि लडिवाळपणा हळूहळू शिक्षकाच्या स्वभावात उतरलेला असतो. त्यामुळे बाहेर कुठेही गेल्यावर त्याच्या मवाळ, प्रेमळ आणि मधुर बोलण्यामुळे, “तुम्ही शिक्षक आहात का?” असा प्रश्न सहज विचारला जातो.
समोरच्या व्यक्तीचा आदर राखणे, तिचे व्यक्तिस्वातंत्र्य जपणे आणि तिच्या भावनांना हळुवार फुंकर घालणे, हे विद्यार्थ्यांशी नाते जपत असताना शिक्षकाच्या अंगवळणी पडते. "मुले म्हणजे देवाघरची फुले" असे म्हणतात. या फुलांचा सुगंध घेण्याची आणि त्यांना हळुवारपणे फुलवण्याची खरी कसोटी शिक्षकाचीच असते. ही फुले पुढे कोणत्या फुलदाणीत अधिक सुंदर दिसतील, यासाठी त्यांना घडवण्याचे कार्य शिक्षक करत असतो. कधी प्रेमाने तर कधी रागावून तो विद्यार्थ्यांना योग्य दिशा देत असतो.
सेवेनंतरचे जीवन कसे जगायचे, याचा ठोस आराखडा नसतानाच अनेकजण घरी परततात. पुढील दिवस काहीसे नकोसे वाटू लागतात. दिनचर्या बदलते. घरातील माणसे आणि बाहेरील समाज आपल्याला कितपत समजून घेईल, याचीही शाश्वती नसते. शिक्षक म्हणून आयुष्याचा बराच काळ विद्यार्थ्यांसोबत घालवल्यानंतर आपणदेखील त्यांच्यासारखेच निरागस झालो आहोत, याची जाणीव सेवानिवृत्तीनंतरच्या काही दिवसांत होऊ लागते.
समाज जेव्हा कठोर वास्तवाची जाणीव करून देतो, तेव्हा शाळेच्या चार भिंतीतील भावविश्व किती समृद्ध होते याची प्रकर्षाने जाणीव होते. आता कुटुंबाला भरपूर वेळ देता येईल, असे वाटते; परंतु त्यांनाही आपल्या सहवासाची किती गरज आहे, याचाही विचार करावा लागतो.
"सेवानिवृत्तीनंतर काय करायचे?" हा प्रश्न अनेकांना सतावत असतो. जीवन जिथे घेऊन जाईल तिकडे वाहवत जायचे की स्वतः काही नियोजन करायचे, हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. आपल्या आवडी-निवडी, छंद जोपासताना शरीर आणि मनाचे आरोग्य जपण्याचेही नियोजन आवश्यक असते.
जीवनप्रवासाची रेल्वे आता एका नव्या जंक्शनवर येऊन थांबलेली असते. येथून पुढे अनेक दिशांना जाण्याचे मार्ग खुले असतात. गाडी त्याच स्थानकावर कायम उभी ठेवणे योग्य नसते. म्हणूनच सेवानिवृत्ती म्हणजे थांबा नव्हे, तर नव्या प्रवासाची सुरुवात आहे, हा दृष्टिकोन स्वीकारला तर पुढील जीवन अधिक सुखी, समाधानी आणि समृद्ध होऊ शकते.
रोजचा हलकासा व्यायाम, चालणे, योगाभ्यास यांमुळे शरीर आणि मनाला उभारी मिळते. हलका आहार, पुरेशी झोप आणि नियमित दिनचर्या यांना प्राधान्य दिले पाहिजे. भेटीगाठी, गप्पागोष्टी आणि सामाजिक सहभाग यांमधून मनातील विचारांना अभिव्यक्त होण्याची संधी मिळते. सेवानिवृत्तीनंतर एखादा नवा उपक्रम हाती घेऊन तो यशस्वीपणे पूर्ण करण्याचा संकल्प केला, तर जीवनाला नवे अर्थ प्राप्त होतात.
वार्धक्य ही केवळ शारीरिक किंवा वैद्यकीय अवस्था नसून ती मानसिक आणि सामाजिक प्रक्रियादेखील आहे. या अवस्थेचा सकारात्मक स्वीकार करून मन, भावना आणि शरीर यांचा समतोल राखत जीवनाचा पुढील टप्पा आनंदाने जगण्यातच खरा शहाणपणा आहे.
जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते...
असं म्हणत सेवानिवृत्त होऊन घरी जात असताना,
सेवानिवृत्ती म्हणजे शेवट नव्हे; ती अनुभवांच्या शिदोरीसह सुरू होणारी जीवनाची दुसरी, अधिक समृद्ध आणि अर्थपूर्ण इनिंग आहे. हा दृष्टिकोन तयार केला तर अजून पुढे नवनवीन सुंदर मकाम भेटत जातील...

No comments:
Post a Comment