बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी दंड न भरल्यास मालमत्ता जप्त; लिलावातून वसुली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 5, 2026

बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी दंड न भरल्यास मालमत्ता जप्त; लिलावातून वसुली

 बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी दंड न भरल्यास मालमत्ता जप्त; लिलावातून वसुली





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील ५४ मीटर बाह्यवळण रस्त्यालगतच्या सलगर वस्ती परिसरात झालेल्या मोठ्या प्रमाणावरील बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणात संबंधित जागा मालकांवर महापालिकेकडून कठोर कारवाईची तयारी सुरू झाली आहे. या प्रकरणात आकारण्यात येणारा दंड न भरल्यास संबंधितांची मालमत्ता जप्त करून त्याच्या लिलावातून रक्कम वसूल करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी दिला.

सलगर वस्ती परिसरातील एका खासगी जागेत तब्बल ११८ वृक्षांची बेकायदेशीर तोड करून त्याची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित जागा मालकांचा शोध घेण्यास प्रशासनाला काही दिवस अडचणी आल्या. सातबारा उतारा मिळाल्यानंतर अखेर महापालिकेने सलगर वस्ती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

या प्रकरणी पोलिसांनी अंकित शिवानंद पाटील, आशा राजेंद्र हजारे, राजेंद्र पुंडलिक हजारे आणि शिवानंद यशवंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतरही दंडात्मक कारवाईबाबत विलंब होत असल्याची टीका होत होती.

दरम्यान, बुधवारी आयुक्त सचिन ओंबासे यांनी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, उद्यान विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी संबंधित जागा मालकांना नोटीस बजावून दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आयुक्तांनी सांगितले की, वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची मोठी हानी झाली असून अशा प्रकारांना अजिबात पाठीशी घातले जाणार नाही. नियमानुसार मोठा दंड आकारला जाईल आणि तो न भरल्यास मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येईल.
उपमहापौरांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासन सक्रिय

वृक्षतोडीसारखा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतरही प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई केली नसल्याबद्दल उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच एवढ्या मोठ्या घटनेनंतर महापालिका आयुक्तांनी घटनास्थळी भेट का दिली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर आयुक्तांनी स्वतः घटनास्थळी भेट देत पुढील कारवाईची दिशा स्पष्ट केली.

महापालिकेच्या या भूमिकेमुळे बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात प्रशासन कठोर भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages