सांगोला (कटूसत्य वृत्त) : येत्या आठ दिवसांत सांगोला तालुक्यातील वाढते भारनियमन कमी झाले नाही, तर महावितरणच्या कार्यालयांना टाळे ठोकून अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरकू देणार नाही, असा इशारा माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी दिला.
तालुक्यातील वाढते भारनियमन, शेती व पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणींच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार साळुंखे-पाटील यांच्या संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
बैठकीस माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, पंचायत समिती सभापती पूनम इंगवले, तानाजी पाटील, अनिल खटकाळे, मधुकर बनसोडे, नगरसेवक गणेश बनकर, सखाराम तंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम बाबर, अरुण घुले, डॉ. सुदर्शन इंगवले, दिलीप नागणे, चंद्रकांत कारंडे, विजयकुमार शिंदे, चंद्रकांत चौगुले, समीर पाटील, विजय बेलपले, डॉ. राज मिसाळ आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना दीपक साळुंखे-पाटील म्हणाले, टेंभू, म्हैसाळ आणि निरा उजवा कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे मिळाले. मात्र, कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे टेंभू योजनेचे पाणी सोडण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची गरज भासू लागली आहे.
तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून अधिक सक्रियपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भविष्यातील राजकारणासाठी आत्मचिंतन आवश्यक असल्याचे नमूद करत, पराभवाने खचून जाणारा मी नेता नाही. यापुढे अधिक दक्षतेने राजकारण करण्यासाठी सज्ज असून पुढील राजकीय दिशा लवकरच निश्चित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment