मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजना अद्याप कागदावरच; लाभार्थी प्रतीक्षेत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 15, 2026

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजना अद्याप कागदावरच; लाभार्थी प्रतीक्षेत

 मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजना अद्याप कागदावरच; लाभार्थी प्रतीक्षेत


 

मोहोळ (कटूसत्य वृत्त) : राज्य सरकारने मोठ्या गाजावाजात जाहीर केलेली मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजना अद्याप प्रत्यक्षात सुरू झालेली नसल्याने हजारो इच्छुक लाभार्थी प्रतीक्षेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाकडून मोठ्या प्रमाणावर प्रचार-प्रसार करण्यात आला. मात्र, महाडीबीटी पोर्टलवरील आवश्यक तांत्रिक बदल पूर्ण न झाल्याने योजनेची अंमलबजावणी रखडल्याचे समोर आले आहे.
पशुसंवर्धन विभागाने या योजनेसाठी सुमारे २ हजार ४०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे केल्याची माहिती आहे. या योजनेंतर्गत गाई-म्हशी, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन, चारा उत्पादन, दुग्ध व्यवसाय तसेच पशुखाद्य आणि प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. ग्रामीण भागातील बेरोजगार युवक आणि शेतकऱ्यांसाठी ही योजना महत्त्वाची मानली जात आहे.
योजनेच्या अंमलबजावणीपूर्वी महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक बदल करणे गरजेचे असून त्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. प्रत्यक्ष अंमलबजावणीस आणखी दीड ते दोन महिने लागू शकतात, अशी माहिती विभागीय सूत्रांनी दिली.
दरम्यान, योजनेची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली असली तरी त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद अद्याप झालेली नसल्याने लाभार्थ्यांना अनुदान वितरणासाठी निधी उपलब्ध होण्याबाबतही अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे योजना जाहीर होऊनही प्रत्यक्ष लाभ मिळण्याचा मार्ग अद्याप मोकळा झालेला नाही.
योजनेच्या तयारीचा भाग म्हणून जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले असून योजना सुरू होताच अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी विभागाने तयारी केली आहे. मात्र, घोषणा होऊनही प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार, महाडीबीटी पोर्टलवरील तांत्रिक बदल पूर्ण झाल्यानंतरच योजना सुरू होणार असून यासाठी आणखी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages