उमाबाई श्राविका विद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उमाबाई श्राविका विद्यालयात लोकनायक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती गुरुवारी (दि. 26) उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापिका अश्विनी पंडित, मार्गदर्शिका दीप्ती शहा, उपमुख्याध्यापिका माधवी खोत, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ, सहशिक्षिका राजश्री आगरखेड, प्रीती व्हराडे तसेच सहशिक्षक अनुप कस्तुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी सहशिक्षिका प्रियंका जैन यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, कोल्हापूर संस्थानचे राजे असलेल्या शाहू महाराजांनी सामाजिक समतेसाठी आयुष्यभर कार्य केले. सर्व जातींच्या मुलांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची स्थापना, शिष्यवृत्ती योजना, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी तसेच मागासवर्गीयांसाठी ५० टक्के आरक्षण लागू करून सामाजिक न्यायाची भक्कम पायाभरणी केली. बालविवाहास विरोध करून ‘सर्व माणसे समान आहेत, जातिभेद हा माणुसकीला कलंक आहे’ हा विचार त्यांनी समाजात रुजविला. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना ‘राजर्षी’ ही पदवी बहाल करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख राजश्री आगरखेड यांनी केले, तर आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक सुहास छंचुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हरी ऐवळे, सुनंदा भालेराव, कांबळे मावशी आणि रेखा मावशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment