७४ नाल्यासंदर्भात नागरिकांच्या हरकती, सूचना मागविण्याची आवश्यकता - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 27, 2026

७४ नाल्यासंदर्भात नागरिकांच्या हरकती, सूचना मागविण्याची आवश्यकता

 ७४ नाल्यासंदर्भात नागरिकांच्या हरकती, सूचना मागविण्याची आवश्यकता




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेने शहरातील पावसाळी पाणी साचण्याच्या समस्येवर ठोस तोडगा काढण्यासाठी ७४ नाल्यांचा पर्जन्यजल नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन आराखड्यास महापालिका आयुक्तांनी सक्षम मंजुरी दिली आहे.

दरम्यान, संभाव्य अडचणी व समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याने या नाल्यासंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी महापालिका सभागृह येथे नरेंद्र काळे यांनी केली आहे.

सोलापूर शहरात दरवर्षी पावसाळ्यात सखल भागांमध्ये पाणी साचून नागरिकांना होणाऱ्या त्रासावर आता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत. सोलापूर महानगरपालिकेने शहरातील पावसाळी पाणी साचण्याच्या समस्येवर ठोस तोडगा काढण्यासाठी ७४ नाल्यांचा पर्जन्यजल नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असून या आराखड्यास यापूर्वीच महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सक्षम मंजुरी दिली. सन २०१८, २०२० आणि २०२५ मध्ये शहरातील अनेक भागांमध्ये गंभीर जलसंचय निर्माण झाला होता. पावसाचा योग्य निचरा न होणे, नैसर्गिक प्रवाहात अडथळे व नाल्यांवरील अतिक्रमण ही यामागील प्रमुख कारणे होती. ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी महानगरपालिकेने आराखडा तयार केला. ड्रोन सर्व्हेक्षण, सॅटेलाईट इमेज, टोपोशीट व टोटल स्टेशन सर्व्हेच्या आधारे शहरातील १७८ चौ.कि.मी. क्षेत्रात ७४ नाले निश्चित करण्यात आले असून, त्यांची ६ बेसिनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. नाल्यांची एकूण लांबी सुमारे ११५.७७ कि.मी. इतकी आहे.आराखड्यानुसार नाल्यांची सफाई, गाळ काढणे, अतिक्रमणे हटवणे, नाल्यांची रुंदी व खोली वाढवणे, भूमिगत नाले, बॉक्स कल्व्हर्ट व क्रॉस ड्रेनेजची कामे करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ३० नाल्यांवर प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, हा आराखडा तयार करण्यापूर्वीच या नाल्या संदर्भात सोलापूर शहरातील नागरिकांकडून हरकती व सूचना मागविणे आवश्यक होते. मात्र तसे न करता आराखड्यात त्याचा समावेश झाला. अनेक भागातील नागरिकांच्या त्या त्या ठिकाणच्या नाल्यांना हरकती आहेत. नाल्याचा प्रवाह व्यवस्थितरीत्या रेखांकित करण्यात आला नाही. यामुळे अनेक मिळकती व बांधकामे प्रभावित होणार आहे.

यामुळे संबंधितांचे मोठे नुकसान होणार आहे. यामुळे यास नागरिकांच्या हरकती आहेत. त्याचा विचार सद्यस्थितीत करण्याची नितांत गरज आहे.

महापालिका प्रशासनाने प्रत्यक्षात अडचणी व पाण्याचा प्रवाहाचा अभ्यास करूनच आराखड्यामध्ये याचा समावेश करणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही. परिणामी याचा फटका त्या त्या परिसरातील बाधित मिळकतदारांना बसणार आहे. नाल्याचा प्रवाह सुस्थितीत राहणे महत्त्वाचे आहे. यामुळे नव्या आपत्ती उद्भवू नये याकरिता महापालिका प्रशासनाने या नाल्या संदर्भात हरकती व सूचना मागविण्याची गरज आहे, असे सभागृहनेते नरेंद्र काळे यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages