झेडपी कर्मचाऱ्यांसाठी एसबीआय ‘सॅलरी पॅकेज’ सामंजस्य करार; एक कोटीपर्यंत विमा संरक्षणासह विविध लाभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 13, 2026

झेडपी कर्मचाऱ्यांसाठी एसबीआय ‘सॅलरी पॅकेज’ सामंजस्य करार; एक कोटीपर्यंत विमा संरक्षणासह विविध लाभ

 झेडपी कर्मचाऱ्यांसाठी एसबीआय ‘सॅलरी पॅकेज’ सामंजस्य करार; एक कोटीपर्यंत विमा संरक्षणासह विविध लाभ



सोलापूर (कटूसत्य वृत्त) : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना वेतन खात्यांतर्गत अधिक सुविधा आणि आर्थिक सुरक्षा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांपर्यंत विमा संरक्षणासह विविध बँकिंग लाभ मिळणार आहेत.

शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात या सामंजस्य कराराची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन होते. प्रारंभी मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी प्रास्ताविक करत सॅलरी पॅकेज योजनेचे महत्त्व अधोरेखित केले.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक आनंदकुमार पाटकर यांनी एसजीएसपी/एमओयू सॅलरी पॅकेज योजनेची सविस्तर माहिती दिली. या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू लाभ, कायमस्वरूपी अपंगत्व लाभ, अंशतः अपंगत्व लाभ, वैद्यकीय खर्चासाठी विमा संरक्षण, वैयक्तिक विमा तसेच विविध बँकिंग सुविधा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पात्र कर्मचाऱ्यांना या योजनेतून एक कोटी रुपयांपर्यंत विमा संरक्षणाचा लाभ मिळू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी कर्मचाऱ्यांना आवाहन करताना सांगितले की, प्रत्येकाने आपले एसबीआय वेतन खाते या सॅलरी पॅकेज योजनेत समाविष्ट आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. खाते समाविष्ट नसल्यास संबंधित शाखेशी संपर्क साधून ते तातडीने सॅलरी पॅकेजमध्ये रूपांतरित करावे. तसेच खात्यातील नामनिर्देशनाची माहिती अद्ययावत ठेवण्याचेही त्यांनी आवाहन केले.

प्राथमिक टप्प्यात एसबीआय खातेदार कर्मचाऱ्यांना या सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, भविष्यात इतर बँकांच्या खातेदार कर्मचाऱ्यांनाही अशाच प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे जैन यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक लेखाधिकारी उमाकांत राजगुरू यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages