महायुतीचा धर्म पाळा; राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करा : उदय सामंत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 13, 2026

महायुतीचा धर्म पाळा; राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करा : उदय सामंत

 महायुतीचा धर्म पाळा; राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करा : उदय सामंत


सोलापूर (कटूसत्य वृत्त) : विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळत महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना विजयी करण्यासाठी सर्व घटक पक्षांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. तसेच भाजपनेही शिवसेनेला कायम सोबत घेण्याची भूमिका ठेवावी, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

होटगी रोडवरील हॉटेल बालाजी सरोवर येथे शुक्रवारी महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी महायुतीतील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उदय सामंत म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे. आगामी काळात विकासाला प्राधान्य देत महायुतीतील सर्व घटक पक्षांनी परस्पर सहकार्याची भूमिका ठेवावी. विधान परिषद निवडणुकीत राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही महायुतीतील ऐक्यावर भर दिला. ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढविल्या असल्या तरी पालकमंत्री म्हणून आपण संपूर्ण महायुतीचे प्रतिनिधित्व करतो. भविष्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रितपणे काम करत विकासकामांना गती द्यावी. सर्व घटक पक्षांच्या सहकार्याने महायुती अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

बैठकीत महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, खासदार धैर्यशील माने, खासदार चंद्रहार पाटील, माजी आमदार शहाजीबापू पाटील, सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके, दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे, अनिल सावंत, रमेश बारसकर, संजय कोकाटे तसेच महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

मंगेश चिवटे यांची समन्वयासाठी शिष्टाई

सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय राहावा आणि जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका निवडणुकांमुळे निर्माण झालेला दुरावा दूर व्हावा, यासाठी आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा बैठकीत झाली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा नियोजित दौरा पुढे ढकलून उद्योगमंत्री उदय सामंत यांचा सोलापूर दौरा निश्चित करण्यात आला. त्यानंतर शिवसेना आणि भाजप नेत्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यासाठी चिवटे यांनी पडद्यामागे महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages