मंगळवेढ्यात तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक; बदली न करण्याची मागणी
मंगळवेढा (कटूसत्य वृत्त) : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोर, बोगस व्यावसायिक, गुटखा विक्रेते आणि बनावट औषध विक्रेत्यांविरोधात सुरू केलेल्या धडक कारवाईच्या समर्थनार्थ मंगळवेढा येथे त्यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच त्यांची किमान तीन वर्षे बदली करू नये, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
गुटखा विक्री, भेसळयुक्त दूध व अन्नपदार्थ तसेच बनावट औषधांच्या विरोधात तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या कठोर कारवाईमुळे राज्यातील माफिया व भेसळखोरांचे धाबे दणाणले असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. त्यांच्या धाडसी, पारदर्शक आणि प्रामाणिक कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
मंगळवेढा परिसरात भेसळयुक्त अन्नपदार्थ, निकृष्ट दर्जाच्या वस्तूंची विक्री, अवैध धंदे तसेच नागरिकांच्या आरोग्याशी व सुरक्षिततेशी खेळणाऱ्या प्रवृत्तीविरोधात अधिक कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली. या कार्यक्रमात तालुक्यातील नागरिक, युवक, शेतकरी, व्यापारी, महिला, सामाजिक कार्यकर्ते, माजी सैनिक संघटनेचे सदस्य तसेच विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी वारी परिवाराचे अध्यक्ष सतीश दत्तू यांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “खुर्चीचा मान हा पदामुळे मिळतो, मात्र जनतेचा मान हा सेवेमुळे मिळतो. शासनाचा पगार हा केवळ घर चालवण्यासाठी नसून जनतेची कामे प्रामाणिकपणे पार पाडल्याबद्दल मिळणारी लोकसेवेची पावती आहे. तुकाराम मुंढे यांच्यासारखा अधिकारी प्रामाणिकपणे काम करत असेल तर इतर अधिकाऱ्यांनीही त्यांचा आदर्श घ्यावा.”

No comments:
Post a Comment