गॅस सिलिंडर दरवाढ, लोडशेडिंग व कांदा दराबाबत शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 13, 2026

गॅस सिलिंडर दरवाढ, लोडशेडिंग व कांदा दराबाबत शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन

गॅस सिलिंडर दरवाढ, लोडशेडिंग व कांदा दराबाबत शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन


मोहोळ (कटूसत्य वृत्त) : वाढती महागाई, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरातील वाढ, विजेचे लोडशेडिंग, शेतकरी आत्महत्या आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारा अत्यल्प दर या गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मोहोळ तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. माजी जिल्हा उपप्रमुख दादाराव पवार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असून घरगुती गॅस सिलिंडरच्या सतत वाढणाऱ्या किमतीमुळे महिलांसह कुटुंबांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. दुसरीकडे शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून अनेकांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

जिल्ह्यात सुरू असलेल्या लोडशेडिंगमुळे शेतीपंपांना वेळेवर वीजपुरवठा होत नसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना बाजारात कांद्याला अत्यल्प दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे कांद्याला हमीभाव देण्यासाठी शासनाने बाजारात हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तातडीची आर्थिक मदत, पुनर्वसन पॅकेज, कर्जमाफी तसेच विविध कृषी अनुदान योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी दादाराव पवार, दादाराव गायकवाड, विष्णू कदम, शिवाजी गायकवाड, लिंगराज व्हनमाने, प्रभाकर हावळे, महादेव आवारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलनाचा इशारा

राज्यातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages