सांगोला (कटूसत्य वृत्त) : पावसाने अद्याप पुरेशी हजेरी लावलेली नसल्याने सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. तालुक्यातील अनेक भागांत पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न तीव्र झाला असून नागरिक आणि शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून पाणी व चाऱ्याची उपलब्धता करावी, अशी मागणी होत आहे.
सांगोला शहरासह तालुक्यातील विविध भागांमध्ये पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. माण नदीकाठच्या विहिरींनी तळ गाठला असून विंधन विहिरींसह इतर जलस्रोतही कोरडे पडू लागले आहेत. भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याने उपलब्ध पाण्याची चवही बदलल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
माण नदीमध्ये टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी अद्याप अनेक भागांत पोहोचलेले नाही. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. कोळा परिसरातील बुद्धेहाळ व यमाई तलावांमध्येही अद्याप पाणी सोडण्यात आले नसल्याने शेतीसाठी आवश्यक पाण्याची कमतरता जाणवत आहे.
घेरडी परिसरातील परिस्थिती विशेषतः चिंताजनक आहे. नागरिकांना पाच-पाच दिवस पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जवळा परिसरातही आठवड्यातून तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा होत असून शेती आणि पशुधन दोन्ही संकटात सापडले आहेत.
महूद परिसरातील लक्ष्मीनगर, इटकी, कटफळ आदी गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू आहे. नीरा उजवा कालव्याचे पाणी वेळेवर व पूर्ण क्षमतेने मिळत नसल्याने शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचत नाही. तसेच चिंचोली तलावही अद्याप भरला गेलेला नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. फाटा क्रमांक चार व पाच या कालव्यांनाही पुरेसे पाणी न मिळाल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.
नाझरा आणि एखतपूर परिसरातही पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. बेलवण नदीत पाणी न सोडल्याने येथील पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. अनेक पाणीपुरवठा विहिरी आणि विंधन विहिरी कोरड्या पडल्या असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
चारा व पाण्याची तातडीची गरज
जून महिन्यातच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आगामी काळ अधिक कठीण जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करणे, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे तसेच सिंचन योजनांचे पाणी तातडीने संबंधित भागांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याची मागणी नागरिक व शेतकरी करीत आहेत.

No comments:
Post a Comment