शेतकऱ्यांना सन्मानजनक कर्जमाफी द्या; जाचक अटी रद्द करण्याची युवासेनेची मागणी
करमाळा(कटूसत्य वृत्त):- राज्य शासनाने जाहीर केलेल्या सन २०२६ च्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी तात्काळ रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट व सन्मानजनक कर्जमाफी लागू करावी, अशी मागणी युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) करमाळा तालुक्याच्या वतीने तहसीलदारांमार्फत शासनाकडे करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले असून, राज्य शासनाच्या नव्या निकषांमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात २०१९ मधील कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना २०२६ च्या योजनेत मर्यादित लाभ देण्याची अट अन्यायकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच ३१ मार्च २०२५ पर्यंतची सर्व थकीत पीककर्जे व मुदत कर्जांचा समावेश करून सरसकट कर्जमाफी लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ठेवण्यात आलेली ‘चार वेळा कर्जाची परतफेड’ ही अट रद्द करून सर्व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या दिल्या जाणाऱ्या ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानात वाढ करून ते १ लाख रुपये करण्यात यावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून कर्जमाफी योजनेतील सर्व जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवासेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment