परीक्षा, प्रवेश पोर्टलच्या तांत्रिक अडचणींसाठी उद्या सोलापूर विद्यापीठात विशेष ट्रेनिंग
कॉलेज कर्मचारी युनियनच्या पाठपुराव्याला यश
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ऑनलाइन प्रवेश आणि परीक्षा पोर्टलमधील तांत्रिक अडचणींमुळे महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणींची दखल विद्यापीठ प्रशासनाने घेतली आहे.
कॉलेज कर्मचारी युनियन, सोलापूर जिल्हा यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर, शनिवार २७ जून २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजता विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुल सभागृहात सर्व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी एका विशेष ट्रेनिंग प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले आहे.
कॉलेज कर्मचारी युनियनने २५ जून रोजी कुलगुरूंची भेट घेऊन ऑनलाइन पोर्टलवरील त्रुटींमुळे विद्यार्थी, पालक आणि कर्मचाऱ्यांना होणाऱ्या त्रासाबाबत निवेदन दिले होते. यावर तात्काळ तोडगा काढण्यासाठी कुलगुरूंनी या विशेष प्रशिक्षणाचे आदेश दिले. या ट्रेनिंगमध्ये ऑनलाइन प्रवेश पोर्टल मधील नवीन सुधारणा, परीक्षा विभागाचे फॉर्म सबमिशन, हॉलतिकीट, निकाल प्रक्रिया आणि हेल्पडेस्क प्रणाली यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
या ट्रेनिंगसाठी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील प्रवेश व परीक्षा प्रक्रिया पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. ट्रेनिंगला येताना गेल्या महिनाभरात आलेल्या तांत्रिक अडचणींची लेखी यादी सोबत आणायची आहे.
सदर निवेदन देताना विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. मलिक रोकडे, अधिसभा सदस्य अजितकुमार संगवे, सिद्धेश्वर स्वामी, युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले, सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, उपाध्यक्ष आनंद व्हटकर आणि सुरेश वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तांत्रिक अडचणींमुळे होणारा मानसिक ताण कमी करण्यासाठी सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी या ट्रेनिंगला वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन कॉलेज कर्मचारी युनियन, सोलापूर जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
-------
No comments:
Post a Comment