४० विद्यार्थ्यांना पाचवीत प्रवेश नाकारला; मुख्याध्यापकांना फौजदारी कारवाईचा इशारा
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : शहरातील दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या उर्दू हायस्कूलमध्ये इयत्ता चौथी उत्तीर्ण झालेल्या सुमारे ४० विद्यार्थ्यांना पाचवीत प्रवेश नाकारल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची दखल घेत जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी शाळा व्यवस्थापनाला नोटीस बजावून तातडीने खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना नियमानुसार प्रवेश न दिल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
माहितीनुसार, पहिली ते चौथीपर्यंत याच शाळेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पाचवीत प्रवेश नाकारण्यात आला असून त्यांच्या जागी इतर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
विधान परिषदेचे सदस्य तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या संदर्भात शिक्षण विभागाकडे तक्रार केल्यानंतर चौकशीला सुरुवात करण्यात आली. शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी शाळेचे अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापक गफूर सगरी यांना पाठविलेल्या पत्रात शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन झाल्याचे नमूद केले आहे.
नोटीसमध्ये हा प्रकार अत्यंत बेजबाबदार व नियमबाह्य असल्याचे म्हटले असून चौथी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ पाचवीत प्रवेश देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. समाधानकारक खुलासा सादर न केल्यास तसेच विद्यार्थ्यांना प्रवेश न दिल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून मुलांच्या शिक्षणाशी खेळ केल्याचा आरोप शाळा प्रशासनावर करण्यात येत आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवता येत नसल्याने या प्रकरणाकडे शिक्षण क्षेत्राचे विशेष लक्ष लागले आहे. शिक्षण विभागाच्या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इतर शैक्षणिक संस्थांनाही स्पष्ट संदेश गेल्याची चर्चा सुरू आहे.
चौकट
क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश; परवानगीची प्रतीक्षा
दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी उर्दू हायस्कूलमध्ये पाचवीच्या वर्गासाठी आरटीई नियमानुसार आणि मंजूर क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याचे मुख्याध्यापक गफूर सगरी यांनी सांगितले. संचमान्यतेनुसार शाळेला केवळ सहा शिक्षक पदांची मंजुरी असून आधीच विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने बसण्याची जागाही अपुरी पडत आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी २० जून रोजी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे ई-मेलद्वारे प्रस्ताव पाठविण्यात आला असून परवानगी मिळताच सर्व विद्यार्थ्यांना पाचवीत प्रवेश दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment