मध्यरात्री पुणे–सोलापूर महामार्गावर जबरी चोरी करणारी टोळी दोन दिवसांत जेरबंद; टेंभुर्णी पोलिसांच्या डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 25, 2026

मध्यरात्री पुणे–सोलापूर महामार्गावर जबरी चोरी करणारी टोळी दोन दिवसांत जेरबंद; टेंभुर्णी पोलिसांच्या डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

 मध्यरात्री पुणे–सोलापूर महामार्गावर जबरी चोरी करणारी टोळी दोन दिवसांत जेरबंद; टेंभुर्णी पोलिसांच्या डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई




टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):-  पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री कांदा वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्याला मारहाण करून वाहनासह लाखोंचा ऐवज जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा टेंभुर्णी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेली महिंद्रा बोलेरो पिकअप व कांद्याचा माल असा एकूण १० लाख ३२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १७ जून २०२६ रोजी फिर्यादी शिवाजी नामदेव नांदे (वय ४५, रा. वीरवाडी नं.२, मदनवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) व त्यांचे चुलत भाऊ तानाजी तात्याबा नांदे (रा. राजेवाडी, ता. दौंड, जि. पुणे) हे शेतातील कांदा दोन नवीन महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनांत भरून विक्रीसाठी सोलापूर मार्केटकडे निघाले होते.
दरम्यान, १८ जून २०२६ रोजी मध्यरात्री १२.०५ वाजण्याच्या सुमारास टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सापटणे (टेंभुर्णी) गावच्या शिवारात राजस्थान ढाब्यापुढे सुमारे तीन किलोमीटर अंतरावर त्यांच्या वाहनाचा तीन अज्ञात व्यक्तींनी मोटारसायकलवरून पाठलाग केला. संबंधितांनी चालकाला गाडी नीट चालवत नसल्याचे सांगून वाहन थांबवले व चालकासह शेतकरी शिवाजी नांदे यांना मारहाण केली.
यानंतर आरोपींनी कांद्याची ४३ पोती, नवीन पासिंग न झालेली महिंद्रा बोलेरो पिकअप, मोबाईल फोन व कागदपत्रांची पिशवी असा एकूण १० लाख ३४ हजार ३५० रुपयांचा ऐवज जबरीने चोरून नेला.
या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४१६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३५२ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा अंजना कृष्णा आणि पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी विशेष सूचना दिल्या.
त्यानुसार तपास अधिकारी तथा डीबी पथक प्रमुख सपोनि. संदेश बावकर आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान उजनी धरण परिसरात चोरट्यांनी झुडपांमध्ये फेकून दिलेली कांद्याची पोती पोलिसांना मिळाली. तसेच चोरी केलेल्या पिकअप वाहनाचा फास्टॅग आरोपींनी काढून टाकल्याने तपास अधिक आव्हानात्मक बनला होता.
तरीही डीबी पथकाने भिमानगर, रांजणी, हिंगणगाव, तरटगाव, कांदलगाव परिसरात गोपनीय माहिती संकलित करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला.
पोलिसांनी खालील आरोपींना ताब्यात घेतले –
१) प्रणित उर्फ नन्या संजय गायकवाड (वय २१, रा. आंबेडकरनगर, रांजणी, ता. माढा)
२) शाहरूख उर्फ श-या राजू शेख (वय २१, रा. भिमानगर, ता. माढा)
३) अथर्व उर्फ चिकास सोमनाथ खानेवाले (वय १९, मूळ रा. आजोती, ता. इंदापूर, सध्या राजेवलीनगर, इंदापूर)
४) संदेश उर्फ नवा सुभाष भोसले (वय १९, रा. भोसलेवस्ती, बाभुळगाव, ता. इंदापूर)
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी संगनमताने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले वाहन व कांद्याचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींनी यापूर्वी अशा प्रकारचे इतर गुन्हे केले आहेत का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
ही कारवाई टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे डीबी पथक प्रमुख सपोनि. संदेश बावकर यांच्या नेतृत्वाखाली पोहेकाॅ विलास नलवडे, संदीप गिरमकर, मोहन तळेकर, सुरज मुलाणी, चालक हनुमंत देवकर, समाधान धोत्रे तसेच सोलापूर सायबर विभागाचे व्यंकटेश मोरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages