७५ वर्षांपासून स्मशानभूमीविना कुंभेज; वनक्षेत्रात गेलेल्या राखीव जागेसाठी ग्रामस्थांचे आमरण उपोषण Important mainly because it was sent directly to you Click to teach Gmail this conversation is not important - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 25, 2026

७५ वर्षांपासून स्मशानभूमीविना कुंभेज; वनक्षेत्रात गेलेल्या राखीव जागेसाठी ग्रामस्थांचे आमरण उपोषण Important mainly because it was sent directly to you Click to teach Gmail this conversation is not important

 ७५ वर्षांपासून स्मशानभूमीविना कुंभेज; वनक्षेत्रात गेलेल्या राखीव जागेसाठी ग्रामस्थांचे आमरण उपोषण





करमाळा(कटूसत्य वृत्त):- करमाळा तालुक्यातील कुंभेज गावातील स्मशानभूमीचा प्रश्न गेल्या तब्बल ७५ वर्षांपासून प्रलंबित असून या प्रश्नाकडे प्रशासनाच्या समन्वयाच्या अभावामुळे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्मशानभूमीसाठी राखीव असलेली जागाच वनक्षेत्रात गेल्याने गावास आजपर्यंत स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध होऊ शकलेली नाही. या प्रश्नाच्या कायमस्वरूपी निकाली तोडग्यासाठी ग्रामस्थांनी बुधवार (दि. २४ जून) रोजी करमाळा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन छेडले.

कुंभेज येथील गट क्रमांक २३ मधील २१ आर क्षेत्र हे स्मशानभूमीसाठी राखीव असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र प्रशासनातील विविध विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे ही जागा वनक्षेत्रात समाविष्ट झाली. परिणामी गावातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून अनेक वर्षांपासून स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित आहे.
या अन्यायाविरोधात सुहास साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी करमाळा तहसील कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण सुरू केले. गावाच्या मूलभूत हक्काच्या या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे व तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली.
आंदोलनाला विविध राजकीय, सामाजिक आणि बहुजन संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला. यामध्ये भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष देवा लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हा सरचिटणीस संतोष वारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत अवताडे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, अॅड. विशाल घोलप, रिपाईचे (आ) अर्जुन गाडे तसेच सामाजिक कार्यकर्त्या अॅड. सविता शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी प्रशासनाला या प्रश्नाबाबत जाब विचारत स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. स्वातंत्र्यानंतर सात दशकांहून अधिक काळ उलटल्यानंतरही गावाला स्मशानभूमी उपलब्ध नसणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
दरम्यान, तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार विजयकुमार लोकरे, विजयकुमार जाधव तसेच वन विभागाचे अधिकारी उपोषणस्थळी दाखल झाले. त्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली.
तहसील प्रशासनाच्या वतीने उपोषणकर्ते सुहास साळुंखे यांना लेखी आश्वासन देण्यात आले. पुढील आठवड्यात वन विभागाचे अधिकारी, महसूल प्रशासन आणि कुंभेज ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक आयोजित करून स्मशानभूमीच्या प्रश्नावर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे पत्र देण्यात आले.
प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सुहास साळुंखे व ग्रामस्थांनी आपले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले. मात्र, आगामी बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला.
कुंभेज गावाच्या स्मशानभूमीचा प्रश्न आता प्रशासनाच्या स्तरावर कितपत वेगाने मार्गी लागतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages