सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- जिल्हा परिषदेच्या शिवछत्रपती रंगभवन समोरील उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण आणि परिसराचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी महत्त्वाकांक्षी विकास आराखड्याला गती मिळाली आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी मांडलेल्या प्रस्तावाला जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या कामासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यास मान्यता दिली आहे.
या योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याची उंची वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे उद्यानाबाहेरील रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना शिवरायांचा पुतळा तिन्ही बाजूंनी स्पष्टपणे दिसणार आहे. सध्या झाडे व इतर अडथळ्यांमुळे पुतळ्याचे दर्शन मर्यादित होत असल्याची भावना अनेक शिवप्रेमींनी व्यक्त केली होती.
याशिवाय उद्यान परिसरात आकर्षक माहिती फलक, शिवकालीन वास्तुशैलीवर आधारित सजावटीची रचना तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि इतिहासाचा परिचय करून देणारी माहिती व्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्यामुळे हे ठिकाण केवळ उद्यान न राहता इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी केंद्र ठरणार आहे.
सदर प्रकल्पाचा आराखडा अंतिम टप्प्यात असून, पुढील वर्षी ६ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनापर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे जिल्हा परिषद उद्यानाचा नवा चेहरा समोर येणार असून, शिवरायांच्या स्मारकाला अधिक भव्य, आकर्षक आणि दिमाखदार स्वरूप प्राप्त होणार आहे.

No comments:
Post a Comment