पुणे इंटरनॅशनल स्कूलमध्ये 'आंतरराष्ट्रीय योग दिन' उत्साहात साजरा
१००० हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांचा सहभाग
पुणे(कटूसत्य वृत्त):- विद्यानगर येथील नामांकित 'पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज'मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. निरोगी शरीर आणि सुदृढ मनासाठी योगाचे महत्त्व पटवून देणाऱ्या या उपक्रमात शाळेतील जवळजवळ १००० विद्यार्थी, १२० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकाच वेळी उपस्थित राहून विविध योगासने करीत योगदिवस साजरा केला.
चलवादी शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा अॅड.रेणुका चलवादी यांच्या विशेष पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात हर्षाली खैरनार यांनी घेतलेल्या भावपूर्ण योग प्रार्थनेने झाली. यानंतर योग शिक्षिका राजश्री शेलार यांनी उपस्थित सर्वांना योगाचे प्रशिक्षण दिले. त्यांनी दैनंदिन जीवनात योगाचे असणारे महत्त्व प्रात्यक्षिकांसह समजावून सांगितले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिर्के, प्राचार्या स्मिता लोंढे, सायली शिंदे, ज्योती सचदेव, बिना कदम, अश्विनी मोहिते आणि जयश्री कदम या मान्यवरांनी प्रत्यक्ष योगासने करून कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांमध्ये योगाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांनी नियमित सराव करावा या उद्देशाने अॅड.रेणुका चलवादी यांच्या वतीने संस्थेला १०० योग मॅट वाटण्यात आल्या.
योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. आजच्या गतिमान आणि ताणतणावाच्या युगात मनाची शांतता आणि शारीरिक सुदृढता राखण्यासाठी योगाशिवाय उत्तम पर्याय नाही. आमच्या विद्यार्थ्यांनी केवळ आजच्या दिवसापुरता योग न करता, त्याला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवावे, हाच या आयोजनामागील आमचा मुख्य हेतू आहे, असे प्रतिपादन यावेळी अॅड.रेणुका चलवादी यांनी व्यक्त केले.
विद्यार्थी दशेपासूनच मुलांवर सुदृढ आरोग्याचे संस्कार होणे गरजेचे आहे. योग केवळ शारीरिक व्यायाम नसून ती एक जीवनपद्धती आहे, जी विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि बौद्धिक क्षमता वाढवण्यास मदत करते. शाळेत अशा आरोग्यदायी उपक्रमांचे आयोजन करून आम्ही सुजाण व सशक्त पिढी घडवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे मत व्यक्त करीत डॉ.हुलगेश चलवादी यांनी सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या. शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाला.
भाजप-आरपीआयच्या वतीने योग मॅटचे वितरण
जागतिक योगदिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) च्या वतीने अॅड.रेणुका चलवादी यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक २, नागपूर चाळ-फुलेनगर परिसरामध्ये योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसिद्ध योगगुरू पार्थ वाणी यांनी यावेळी उपस्थित नागरिकांकडून सहज व प्रभावी योगासने करून घेतली. यावेळी उपस्थित नागरिकांना जवळजवळ १०० ते १५० योग मॅटचे मोफत वाटप करण्यात आले. अॅड.चलवादी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिर्के, संदीप पुरकर, संदीप गोडसे यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:
Post a Comment