१३७८ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेबाबत विभागीय क्रमांक ५ व ६ च्या लोकप्रतिनिधींसोबत महापौरांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर बैठक
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरासाठी प्रस्तावित १३७८ कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे महापौर श्री. विनायक दादा कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय क्रमांक ५ व ६ मधील लोकप्रतिनिधींसोबत सविस्तर आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत विभागीय क्रमांक ५ व ६ मधील प्रभागांमध्ये राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी या विभागांमध्ये टाकण्यात येणाऱ्या मुख्य जलवाहिन्या (पाईपलाईन), वितरण जलवाहिन्यांचे जाळे, नवीन जलकुंभ (पाण्याच्या टाक्या) उभारण्यासाठी आवश्यक जागांची उपलब्धता, महापालिकेच्या मालकीच्या जागांची स्थिती तसेच प्रस्तावित टाक्यांच्या ठिकाणांची माहिती सादर करण्यात आली.
तसेच ज्या ठिकाणी नवीन पाण्याच्या टाक्या व एमबीआर (Master Balancing Reservoir) उभारण्यात येणार आहेत, त्या ठिकाणी महानगरपालिकेची, शासनाची अथवा खाजगी जागा उपलब्ध आहे का याची सविस्तर माहिती संकलित करण्यात यावी, अशा सूचना महापौर श्री. विनायक दादा कोंड्याल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. प्रस्तावित प्रकल्पासाठी आवश्यक जागांची उपलब्धता, भूसंपादनाची आवश्यकता तसेच भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी नियोजनपूर्वक कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
बैठकीत संबंधित प्रभागांतील जुन्या व जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाक्यांची माहिती, त्यांचे पुनर्बांधणी अथवा बदल, नव्याने उभारण्यात येणाऱ्या टाक्यांची संख्या, क्षमता, लाभक्षेत्र तसेच कोणत्या भागांमध्ये नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहेत व जुन्या जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत याची सविस्तर माहिती लोकप्रतिनिधींना देण्यात आली.
महापौर श्री. विनायक दादा कोंड्याल यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींच्या सूचना व शिफारशी जाणून घेतल्या. शहरातील कोणताही भाग पाणीपुरवठा योजनेपासून वंचित राहू नये, सर्व नागरिकांना समान व नियमित पाणीपुरवठा मिळावा, पाण्याचा अपव्यय टाळण्यात यावा तसेच प्रकल्पाची निविदा प्रक्रिया व अंमलबजावणी वेळेत पूर्ण करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजीता ताई चाकोते, सभागृह नेते नरेंद्रजी काळे, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे,नगरसेविका वृषाली चालुक्य,नगरसेवक अहजर हुंडेकरी, नगरसेविका वनिता पाटील,नगरसेविका सुमन चाबुकस्वर नगरसेविका अनिशा मोगल,नगरसेविका वैशाली भोपळे, नगरसेविका वृषाली चालुक्या,सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, विभागीय अधिकारी प्रकाश सांवत, उमर बागवान तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर विभागीय कार्यालय ६ मधील येणाऱ्या प्रभागांमधील आढावा बैठक घेण्यात आला यावेळी. नगरचे नगरसेवक किसन जाधव नगरसेवक सत्यजित गायकवाड नगरसेवक, नगरसेवक राजशेखर पाटील नगरसेवक ऋषिकेश म्हेत्रे, नगरसेविका चैत्राली गायकवाड, नगरसेविका सोनाली गायकवाड, शिवराज गायकवाड, अर्जुन गायकवाड, महादेव गवळी यावेळी प्रभागांमध्ये प्रस्तावित असलेल्या टाक्या तसेच नवीन बांधण्यात येणाऱ्या टाक्या तसेच पाईपलाईन व इतर पाणीपुरवठा संदर्भात चर्चा करण्यात आली
बैठकीत १३७८ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भातील विविध तांत्रिक बाबी, जागा उपलब्धता, जलसाठा क्षमता, वितरण व्यवस्था आणि पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या योजनेमुळे सोलापूर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा होऊन नागरिकांना दीर्घकालीन, शाश्वत व दर्जेदार पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
.png)
No comments:
Post a Comment