'प्रभात फेरी’तून विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत; मोफत पाठ्यपुस्तक वाटपासह शिक्षणाची गोडी वाढविण्याचा उपक्रम
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाचे औचित्य साधत कुंभारी गोदुताई परुळेकर विडी घरकुल परिसरातील नवनीत मराठी विद्यामंदिरात सोमवारी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी भव्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सजविलेला घोडा, बुलेट आणि चारचाकी वाहनांचा ताफा तसेच विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला गुलाब पुष्पांचा वर्षाव यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. प्रभात फेरीदरम्यान नवीन विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय ठरावा आणि विद्यार्थ्यांमधील शाळेविषयीची भीती दूर व्हावी या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमास पालक व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानंतर शाळेत आयोजित स्वागत समारंभात नवनीत मराठी विद्यामंदिराचे मुख्याध्यापक रेणूक चौगुले, वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक संजय बंडगर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे चेअरमन शंकर चौगुले हे होते. यावेळी शंकर चौगुले यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप केली. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी नागराज सर, सौरभ सर आणि अमर सर उपस्थित होते. कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला शासनाच्या नियमानुसार नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. नवीन पुस्तके हातात मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद विशेष लक्षवेधी ठरला. नवीन गणवेश परिधान करून उत्साहाने शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांनी वर्गखोल्यांमध्ये नव्या उमेदीनिशी शिक्षणाला सुरुवात केली. यावेळी पालकांनीही शाळेच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. घोडा, बुलेट व पुष्पवृष्टीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या स्वागतामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन शिक्षणाविषयी आकर्षण आणि गोडी वाढण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास पालक व शिक्षकांनी व्यक्त केला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थीकेंद्रित आणि आनंददायी वातावरण निर्मिती करून नवनीत मराठी विद्यामंदिराने शिक्षणासोबत संस्कार आणि प्रेरणादायी उपक्रमाची परंपरा कायम राखण्याचे चित्र पाहायला मिळाले.


No comments:
Post a Comment