शेतकऱ्यांचे ऊस बिलं थकवले राज्यातील ७ साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 28, 2026

शेतकऱ्यांचे ऊस बिलं थकवले राज्यातील ७ साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई

 शेतकऱ्यांचे ऊस बिलं थकवले राज्यातील ७ साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत बिलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून साखर आयुक्तांनी थकबाकीदार साखर कारखान्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. सोलापूर जिल्ह्यातील गोकुळ शुगर कारखान्यावर आधीच आरआरसी (रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट) कारवाई करण्यात आली होती.

त्यानंतर आता आणखी सहा साखर कारखान्यांवरही साखर आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांतील या सात कारखान्यांकडे तब्बल २३२ कोटी ८० लाख रुपयांची ऊस बिलाची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून थकीत रकमेच्या वसुलीसाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

सात कारखान्यांवर आरआरसी कारवाई

साखर आयुक्त कार्यालयाने सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रत्येकी एका साखर कारखान्यावर आरआरसी कारवाई केली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील भीमा टाकळी सिकंदर आणि श्री संत कुर्मदास माढा या कारखान्यांचाही समावेश आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे वेळेत पैसे देणे बंधनकारक असतानाही अनेक कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात थकबाकी ठेवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून आगामी हंगामासाठीही अडचणी निर्माण होत आहेत.

मागील आठवड्यात झाली होती सुनावणी

थकीत ऊस बिलाच्या प्रकरणात साखर आयुक्तांनी मागील आठवड्यात राज्यातील ५४ साखर कारखान्यांची सुनावणी घेतली होती. या सुनावणीत अनेक कारखान्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने अखेर सात कारखान्यांवर आरआरसी कारवाई करण्यात आली.

साखर आयुक्तांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला असून शेतकऱ्यांचे पैसे थकवणाऱ्या कारखान्यांवर पुढील काळात आणखी कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत दिले आहेत.

आणखी कारखाने रडारवर

सोलापूर जिल्ह्यातील काही अन्य साखर कारखान्यांकडेही मोठ्या प्रमाणात ऊस बिलाची थकबाकी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आणखी काही कारखान्यांवर आरआरसी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेतकरी संघटनांनीही या कारवाईचे स्वागत केले असून थकीत रक्कम तातडीने मिळावी, अशी मागणी केली आहे. ऊस उत्पादकांना वेळेवर पैसे मिळाले नाहीत तर शेतीच्या खर्चाचे नियोजन करणे कठीण होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

कोणत्या कारखान्याकडे किती थकबाकी?

गोकुळ शुगर, थोत्री - १३० कोटी ४६ लाख रुपये
भीमा टाकळी सिकंदर - ३० कोटी २३ लाख रुपये
श्री संत कुर्मदास, माढा - १५ कोटी २८ लाख रुपये
भीमाशंकर, धाराशिव - १२ कोटी २७ लाख रुपये
केदारेश्वर, अहिल्यानगर - २२ कोटी ४५ लाख रुपये
एस. जे. शुगर - २ कोटी रुपये
सचिन घायाळ शुगर, छत्रपती संभाजीनगर - १९ कोटी ५० लाख रुपये

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages