राज्यस्तरीय महिला खो-खो, कबड्डी स्पर्धेचे आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- हिंदू धर्मरक्षिणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि उत्कर्ष क्रीडा मंडळ यांच्या सहकार्याने सोलापुरात राज्यस्तरीय महिला खो-खो आणि कबड्डी स्पर्धेचे आयोजन दि. 28 ते 30 मे 2026 दरम्यान सोलापुरातील नॉर्थकोट प्रशाला मैदानावर करण्यात आले आहे, अशी माहिती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष जयवंत सलगर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कबड्डी व खो-खो राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी प्रत्येकी आठ संघ सहभागी होणार आहेत तसेच दोन्ही स्पर्धांचे मिळून सुमारे 300 खेळाडू उपस्थित राहणार आहेत. कबड्डी स्पर्धा या सायंकाळच्या सत्रात होतील तर सकाळ व संध्याकाळच्या सत्रात खो-खोचे सामने होणार आहेत. या दोन्ही स्पर्धेसाठी प्रत्येकी प्रथम क्रमांक 51 हजार रुपये, स्मृती चषक, द्वितीय क्रमांक 31 हजार रुपये, स्मृती चषक आणि तृतीय क्रमांकासाठी 15 हजार रुपये व स्मृती चषक असे बक्षिसाचे स्वरूप आहे. प्रत्येक स्पर्धेसाठी तीन वैयक्तिक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य , उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, महापौर विनायक कोंड्याल आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग राहणार आहे. या स्पर्धेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टी अध्यक्ष जयवंत सलगर आणि उत्सव अध्यक्ष विकी डोबांळे यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस नागेश खरात, अक्षय वाकसे, सचिन हक्के, शंकर नरोटे, अतुल माशाळ, समर्थ मोटे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment