बालिकेवरील अत्याचाराविरोधात सोलापूरकर रस्त्यावर
नसरापूर घटनेचा निषेध
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुण्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सोलापूरकरांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला.
'पुरावे गोळा करत बसण्यापेक्षा अशा नराधमांना जागेवरच ठेचून काढा; अन्यथा आमच्या हवाली करा, आम्हीच त्याला ठेचून काढू,' अशा संतप्त भावना व्यक्त करत सोमवारी कॅंडल मार्च काढण्यात आला.
चौपाड विठ्ठल मंदिर येथून निघालेला हा मूक निषेध मोर्चा सोलापूर ताडपत्री, सरस्वती बुक डेपो, इंदिरा कन्या प्रशाला मार्गे पुन्हा विठ्ठल मंदिराजवळ विसर्जित करण्यात आला. हातात मेणबत्त्या आणि मोबाईलचे टॉर्च घेऊन उपस्थित नागरिकांनी तीव्र निषेध नोंदवला.
मोर्चात सहभागी अनिता गवळी म्हणाल्या, 'अंगाचा थरकाप अजूनही उडत आहे. प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत, तर जनतेनेच पुढे येऊन कठोर भूमिका घ्यावी लागेल. अशा घटना आपल्या घरापर्यंत येण्याची वाट पाहू नका.'
विद्या शिंदे यांनी ६५ वर्षांच्या आरोपीच्या विकृत मानसिकतेवर संताप व्यक्त करत त्याला तत्काळ शिक्षा देण्याची मागणी केली.
या मोर्चात ५०० हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर संताप आणि डोळ्यांत पीडितेसाठी न्याय मिळवण्याची तीव्र भावना स्पष्टपणे जाणवत होती.
बदलापूरप्रमाणे न्याय हवा
ज्या नीच प्रवृत्तीने हे कृत्य केले, त्याला दोन महिन्यांच्या आत फाशी झालीच पाहिजे. न्यायव्यवस्थेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. नगरसेवक अमोल शिंदे व अक्षय शिंदे यांनी ९० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करून बदलापूर प्रकरणाप्रमाणेच कठोर धडा शिकवण्याची गरज असल्याचे सांगितले.

No comments:
Post a Comment