जिल्हा परिषदेत बदल्यांचे वारे; १२ मेनंतर निर्णय, मुख्यालयात ठाण मांडणाऱ्यांची उचलबांगडी निश्चित?
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय आता १२ मेनंतर होणार आहे. प्रशासकीय व तांत्रिक कारणांमुळे मंगळवारपासून सुरू होणारी बदली प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असून, मुख्यालयात ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना यावेळी बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असल्याची चर्चा प्रशासनात सुरू आहे.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी यापूर्वीच बदल्यांचा कार्यक्रम जाहीर केला होता. अनेक वर्षे एकाच कार्यालयात किंवा विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना इतर विभागात पाठवण्याचे नियोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, यंदा अर्थ विभागातील कर्मचाऱ्यांच्याही बदल्या होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
गतवर्षी काटेकोरपणे राबवलेल्या बदली प्रक्रियेमुळे अनेक कर्मचाऱ्यांना धक्का बसला होता. मात्र, काहींनी बदली किंवा पदोन्नतीच्या माध्यमातून पुन्हा मुख्यालयातच स्थान मिळवले. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर यावेळी प्रशासनाची विशेष नजर असल्याचे समजते.
दरम्यान, बदली प्रक्रिया सुरू असतानाच जंगम यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी कुशल जैन यांनी पदभार स्वीकारला आहे. जैन सध्या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेत असून, लवकरच बदल्यांचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
याचबरोबर, जिल्हा परिषदेत परिचर व इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत असताना गेल्या दहा वर्षांपासून चालकांच्या बदल्या झालेल्या नाहीत, अशी नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे यंदाच्या प्रक्रियेत चालकांच्याही बदल्या करण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये सध्या इच्छित कार्यालय मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असल्या तरी, बदल्या पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनेच केल्या जातील, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment