सिंहगडच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय सुवर्णकामगिरी; सोलापूरात विविध स्तरांतून गौरव - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 18, 2026

सिंहगडच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय सुवर्णकामगिरी; सोलापूरात विविध स्तरांतून गौरव

 सिंहगडच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय सुवर्णकामगिरी; सोलापूरात विविध स्तरांतून गौरव


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे दि. २४ ते २८ एप्रिलदरम्यान पार पडलेल्या साउथ एशियन गोल शॉट बॉल चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने चारही गटांमध्ये विजेतेपद पटकावत अभूतपूर्व कामगिरी केली. या विजयी संघात सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, केगाव (सोलापूर) येथील तब्बल ८ विद्यार्थ्यांचा समावेश होता.


स्पर्धेसाठी भारतीय संघ चेन्नई येथून विमानाने श्रीलंकेला रवाना झाला होता. स्पर्धेत सब-ज्युनियर बॉईज, सब-ज्युनियर गर्ल्स, यूथ बॉईज आणि यूथ गर्ल्स या सर्व गटांमध्ये भारताने अपराजित कामगिरी करत सुवर्णपदकांची लयलूट केली. प्रत्येक गटात भारताने लीग फेरीपासून अंतिम सामन्यापर्यंत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखत शानदार विजय नोंदवले.

सब-ज्युनियर बॉईज गटात भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेवर २३-१८ असा विजय मिळवला, तर सब-ज्युनियर गर्ल्स गटात १९-१६ अशी मात केली. यूथ बॉईज गटात ३६-२७ आणि यूथ गर्ल्स गटात २३-१९ अशा विजयांसह भारताने सर्वच गटांमध्ये सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली.

या स्पर्धेत सिंहगड संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय प्रदर्शन केले. सब-ज्युनियर गर्ल्स गटात कु. जानवी बुराडे, यूथ गर्ल्स गटात कु. श्रद्धा चव्हाण व कु. आर्या पाटणे, सब-ज्युनियर बॉईज गटात आदित्य गुंड, आशिष बनसोडे व समर्थ मगर, तसेच यूथ बॉईज गटात अथर्व गुर्रम व वरुण सरडा यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत देशाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

या ऐतिहासिक यशानंतर सोलापूर महानगरपालिकेचे उपमहापौर ज्ञानेश्वर देवकर आणि पर्यावरण दूत मनोज देवकर यांनी विद्यार्थ्यांना महापालिकेत बोलावून झाडांचे रोपटे देत विशेष सत्कार केला. विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय यशाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

तसेच सरस्वती चौक येथील कॅनरा बँक शाखेतर्फेही यशस्वी विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी शाखा व्यवस्थापक शैलजा हिरेमठ, विनायक दुमालदार, ऋषिकेश होनमाने आणि प्रवीण पंडित यांची उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भविष्यातील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. 

“आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. क्रीडा क्षेत्रात सिंहगडचे विद्यार्थी सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहेत,” असे त्यांनी सांगितले.
या यशामागे भारतीय संघाचे प्रशिक्षक व क्रीडाशिक्षक राजू ठाकूर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. त्यांच्या तांत्रिक प्रशिक्षण, शिस्तबद्ध सराव आणि मानसिक तयारीमुळे संघाने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली.
या ऐतिहासिक विजयामुळे सिंहगड पब्लिक स्कूल तसेच सोलापूर जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले असून, विद्यार्थ्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages