नीट पेपरफुटी प्रकरणी सोलापूरात संतप्त आंदोलन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 18, 2026

नीट पेपरफुटी प्रकरणी सोलापूरात संतप्त आंदोलन

 नीट पेपरफुटी प्रकरणी सोलापूरात संतप्त आंदोलन



मोदी-शहा-प्रधान यांच्या प्रतिमांचे दहन

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- नीट 2026 परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने सोलापुरात जोरदार आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषद पूनम गेट येथे झालेल्या या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय शिक्षणमंत्री  धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतिमांचे दहन करण्यात आले.

भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲड. अनिल वासम यांनी आंदोलनादरम्यान तीव्र शब्दांत भूमिका मांडताना सांगितले की, “दरवर्षी वैद्यकीय शिक्षणासाठी लाखो विद्यार्थी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NEET) देतात. मात्र NTA या राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या निष्काळजीपणामुळे आणि भ्रष्ट कारभारामुळे नीट 2026 चा पेपर फुटला. त्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांचे मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान झाले आहे. या धक्क्यातून तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या असून, त्यास जबाबदार असणाऱ्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा.”

तसेच, “विद्यार्थ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संबंधित यंत्रणा व जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,” अशी मागणीही त्यांनी केली.

शनिवार, दि. १६ मे २०२६ रोजी जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. “NTA यंत्रणा रद्द करा”, “NEET ची फेरपरीक्षा पारदर्शक आणि गोपनीय पद्धतीने घ्या”, “विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस जबाबदार शिक्षणमंत्री राजीनामा द्या”, “चौकशी नको, थेट अटक करा” अशा घोषणा देण्यात आल्या.

आंदोलनावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काही काळ धक्काबुक्की व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र आंदोलकांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवत निषेध अधिक तीव्र केला.

यावेळी संघटनेचे राज्य सचिव साथी दत्ता चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीका करताना म्हटले की, “देशातील शिक्षण व्यवस्था खाजगीकरण आणि भांडवलदारांच्या ताब्यात देण्याचे काम सरकार करत आहे. शिक्षणाचे बाजारीकरण आणि व्यापारीकरण झाल्यामुळे प्रत्येक परीक्षा, प्रवेश प्रक्रिया आणि शुल्काचा वाढता बोजा विद्यार्थ्यांवर टाकला जात आहे. मात्र विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त होत असतानाही सरकार गंभीर नाही. धर्मांधता पसरविणे, सत्ता हस्तगत करणे आणि जनविरोधी धोरणे राबविणे यामध्येच सरकार व्यस्त असून विद्यार्थ्यांचे भविष्य अंधाराकडे ढकलले जात आहे,” अशी जहरी टीका त्यांनी केली.

या आंदोलनात युवा महासंघाचे जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, बालाजी गुंडे, राहुल बुघले, सुनील आमाटी, अप्पाशा चांगले, किशोर झेंडेकर, योगेश अकीम, दिनेश बडगू, चंटी बीटला, विजय साबळे, शाम आडम, गोपाल बंडी, पुष्पा गुरुपनवरु, प्रदीप मरेड्डी, नरेश गुल्लापल्ली तसेच विद्यार्थी आघाडीचे राज्य सहसचिव मल्लेशाम कारमपुरी, नानी माकाम, कुमार येलगेटी, अभिजीत निकंबे, गुंडप्पा डक्का, सय्यद शहापूरे, सद्दाम बागवान आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages