अकलूज पोलिसांची मोठी कारवाई; ठिबक सिंचन संच चोरणारी टोळी जेरबंद, ६ गुन्हे उघड
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज व माळशिरस तालुक्यातील शेती साहित्याची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अकलूज पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.या कारवाईत पोलिसांनी ६ विविध चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून एकूण २ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
*नेमकी घटना काय ?*
दिनांक ६ मे २०२६ रोजी सकाळी फिर्यादी महादेव मारुती एकतपुरे (रा.चौंडेश्वरवाडी) यांच्या शेतातून ठिबक सिंचनाचे पाईप चोरून नेत असताना एका व्यक्तीला रंगेहात पकडण्यात आले होते.याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता चोरीचे मोठे रॅकेट समोर आले.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विकास नाना उर्फ रावसाहेब चोरमले वय २३ (रा.६१ फाटा माळशिरस) असे आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने चौंडेश्वरवाडी परिसरातून ५५ हजार रुपये किमतीचे पाईप चोरल्याची कबुली दिली.इतकेच नाही तर मागील काही महिन्यांत त्याने अकलूज, माळशिरस आणि वेळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या अनेक चोऱ्यांची माहिती दिली.
अकलूज पोलिसांनी आरोपीकडून १००% मुद्देमाल हस्तगत केला असून यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे. एकूण रोख मूल्य: २,४४,००० रुपये (विविध ६ गुन्ह्यातील मुद्देमाल),चोरीसाठी वापरलेली तीन चाकी रिक्षा वाहन (MH 45 AN 6109) आणि एक 'एच.एफ. डिलक्स' मोटारसायकल इतर: औषध फवारणीसाठी वापरले जाणारे एसटीपी मशीन जप्त करण्यात आली आहे.
ही यशस्वी कारवाई सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज पोलीस ठाण्याचे प्रभारी निरज उबाळे व त्यांच्या टीमने केली आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम,पोलीस हवालदार विनोद साठे,अभिजीत कुंभार,अमोल मिरगणे,सुनिल माने आणि पंडीत गवळे यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम हे करत आहेत.या कारवाईमुळे परिसरातून शेती साहित्याची चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

No comments:
Post a Comment