अतिक्रमण हटवा’चा नारा; युवा सेनेच्या उपोषणाने प्रशासन हलले
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ शहरातील मध्यवर्ती बुधवार पेठ परिसरात अतिक्रमणाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून, सार्वजनिक वापरातील विंधन विहीर (हातपंप) बुजविण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकरणात संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा व अतिक्रमणे हटवावीत, या मागणीसाठी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषण छेडले होते.
युवा सेनेचे (उबठा) महेश सुभाषराव देशमुख, विशाल शिंदे, सोमनाथ नाईक आणि सचिन काळे यांनी मोहोळ नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते. मात्र, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांनी कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, सिटी सर्व्हे क्रमांक १५०५ या शासकीय जागेवर अतिक्रमण करून गाळे उभारण्यात आले आहेत. तसेच, सभापती भवनासमोरील सिटी सर्व्हे क्रमांक १६५४ (अ) व १६५४ (ब) या जागांवरही पत्र्याच्या शेडद्वारे अतिक्रमण करून व्यावसायिक गाळे बांधण्यात आले आहेत. या गाळ्यांची बेकायदेशीर विक्री १५ ते २० लाख रुपयांपर्यंत होत असल्याचा आरोप आहे.
या अतिक्रमणांमुळे सार्वजनिक सुविधा बाधित झाल्या असून, विंधन विहीरही बुजविण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
कारवाईचे आश्वासन - मुख्याधिकारी
मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांनी सांगितले की, संबंधित जागांवरील अतिक्रमणधारकांना नोटीस देण्यात आली आहे. भूमी अभिलेख कार्यालयामार्फत तातडीने मोजणी करून हद्द निश्चित केल्यानंतर अतिक्रमण हटविण्यात येईल. तसेच, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाहीही केली जाईल.
"लढा सुरूच राहणार" - युवा सेना
युवा सेनेचे नेते महेश देशमुख यांनी आरोप केला की, अशा प्रकारचे अतिक्रमण प्रशासनाच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. अतिक्रमणामागील जबाबदार नगरसेवक व अधिकारी उघड करून त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
उपोषण स्थळी उपस्थित या आंदोलनात महादेव इंगळे, मयूर सूर्यवंशी, संग्राम जगताप, वैभव चौधरी, अजय देवकते, सोनू जाधव, स्वप्नील देशमुख, शैलेश सुळे, किशोर पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
.jpeg)
No comments:
Post a Comment