अतिक्रमण करून सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करा – पालकमंत्री जयकुमार गोरे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरकरांच्या जागांवर अतिक्रमण करून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच जनतेच्या सेवेत कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही सोडले जाणार नाही, असा इशारा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला.
संभाजी आरमारच्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त बोरोनोको प्रशाला मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या वज्रमूठ मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल तसेच भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री गोरे यांनी संभाजी आरमारच्या गेल्या १८ वर्षांतील सामाजिक कार्याचे कौतुक करत सोलापूरकरांच्या विविध प्रश्नांवर शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. सामान्य नागरिकांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी आपल्या भाषणात आदिला नदी-नाला प्रश्नामुळे बाधित झालेल्या मिळकतधारकांचे प्रश्न, सर्वसामान्यांच्या जागांवरील अतिक्रमणे, दिव्यांग बांधवांसाठीच्या महापालिका निधीचा प्रश्न तसेच रिक्षाचालक कल्याणकारी मंडळाच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात ठोस भूमिका मांडली.
या मेळाव्यात सोलापूर शहर आणि जिल्ह्याचा लौकिक वाढविणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये जनमेजयराजे भोसले, गारमेंट उद्योजक, सोलापूर जिल्हा यंत्रमाग संघ, खाटीक समाज तसेच अजनाळे ग्रामस्थांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी संतोष साळुंखे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या तेजस्वी जीवनावर आधारित शाहिरी जलसा सादर करत उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष नगरसेवक शिवाजी वाघमोडे यांनी केले.
कार्यक्रमास माजी उपमहापौर पद्माकर (नाना) काळे, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ आलुरे, सरचिटणीस गजानन जमदाडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, शहरप्रमुख सागर ढगे, संघटक राज जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment