महापालिका तर्फे ‘दहशतवाद विरोधी दिन’ पाळण्यात आला
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका तर्फे दि. २१ मे रोजी ‘दहशतवाद विरोधी दिन’ पाळण्यात आला. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी २१ मे रोजी हा दिवस पाळला जातो. दहशतवादाच्या धोक्याबाबत समाजात जनजागृती निर्माण करणे तसेच शांतता, मानवता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. याच पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात महानगरपालिकेच्या सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांनी सहभागी होत दहशतवादाचा निषेध व्यक्त केला. यावेळी उपस्थित सर्वांनी देशामध्ये शांतता टिकवून ठेवण्यासाठी तसेच दहशतवादी विचारसरणीच्या विरोधात ठामपणे उभे राहण्याची ‘दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा’ घेतली. सदर कार्यक्रम अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी नियंत्रण अधिकारी तपन डंके, लाईट विभाग प्रमुख परदेशी, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजितकुमार खानसोळे, संगणक विभाग प्रमुख मतीन सय्यद यांच्यासह महानगरपालिकेचे इतर सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाद्वारे सोलापूर महानगरपालिका च्या वतीने देशाची एकता, अखंडता आणि सामाजिक सौहार्द अबाधित राखण्यासाठी कटिबद्ध असल्याचा संदेश देण्यात आला.
.png)
No comments:
Post a Comment