स्वामीभक्तांचा गौरव आणि नामस्मरणाचा भक्तिमय सोहळा
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- नामस्मरणातून मनःशांती, आत्मबल आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. स्वामींच्या चरणी श्रद्धा आणि सबुरी ठेवली तर प्रत्येकाच्या जीवनात चमत्कार घडतात. श्री स्वामी समर्थांच्या नामात जीवनातील संकटांवर मात करण्याचे सामर्थ्य आहे, असे प्रतिपादन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले.
अधिक मासानिमित्त कोल्हापूर श्रीक्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रा सेवाभावी संस्थेच्या वतीने अभिवाडी (कोल्हापूर) येथील दत्त समर्थ सांस्कृतिक भवन येथे श्री स्वामी समर्थ नामस्मरण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुहास पाटील व सामाजिक कार्यकर्ते सत्यजित कदम यांच्या हस्ते महेश इंगळे यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. सुहास पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी उद्योजक नितीन वाडीकर, कृपासिंधू चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संदीप पाटील, करवीर पंचायत समिती सदस्य रवींद्र पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात कोल्हापूर व परिसरात सामाजिक, सेवाभावी आणि आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वामीभक्तांचा महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सुहास पाटील यांनी इंगळे यांची प्रकट मुलाखत घेतली.
या मुलाखतीत इंगळे यांनी अक्कलकोट येथील वटवृक्ष देवस्थानाचे महत्त्व, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत लीला, नामस्मरणाची शक्ती आणि भक्तीमधील सातत्य याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर महाद्वार श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाच्या वतीने नामजप सोहळा संपन्न झाला.
यावेळी नारायण यादव, मनोज माने, रमेश माने, बेगू सुतार, यशवंत चव्हाण, प्रा. शिवशरण अनलेर, अंकुश केल, ज्ञानेश्वर भोसले आदींसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment