सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये पाच दिवसीय ‘IDE बूटकॅम्प’चे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 6, 2026

सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये पाच दिवसीय ‘IDE बूटकॅम्प’चे आयोजन

 सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये पाच दिवसीय ‘IDE बूटकॅम्प’चे आयोजन


✓ राष्ट्रीय पातळीवर ‘नोडल सेंटर’ म्हणून सिंहगड इन्स्टिट्यूटची निवड


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव (सोलापूर) येथे दि. ६ ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत इनोव्हेशन, डिझाईन अँड एंटरप्रेन्योरशिप (IDE) बूटकॅम्प 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

हा प्रतिष्ठित बूटकॅम्प अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) व केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल (MIC) यांच्या पुढाकारातून आयोजित केला जात असून, वाधवानी फाउंडेशन (ज्ञान भागीदार) व SBI फाउंडेशन (संस्थात्मक भागीदार) यांचे सहकार्य लाभले आहे. विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम, डिझाईन थिंकिंग व उद्योजकीय कौशल्यांचा विकास करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या बूटकॅम्पसाठी एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाची राष्ट्रीय पातळीवर ‘नोडल सेंटर’ म्हणून निवड करण्यात आली असून, ही संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. या निवडीमुळे संस्थेच्या नवोपक्रम क्षेत्रातील कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याचे अधोरेखित होते.

देशभरातील ३० ठिकाणी तीन टप्प्यांत हा बूटकॅम्प आयोजित करण्यात येत असून, त्यात पहिला टप्पा ६ ते १० एप्रिल (१३ ठिकाणे), दुसरा टप्पा २० ते २४ एप्रिल (१३ ठिकाणे) आणि तिसरा टप्पा ११ ते १५ मे (४ ठिकाणे) या कालावधीत पार पडणार आहे. एकूण सुमारे ६,५०० विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित असून, त्यात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन (SIH) मधील सहभागी व विजेते, इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल (IIC) संस्थांचे विद्यार्थी तसेच नवकल्पनात्मक आयडिया किंवा प्रोटोटाइप असलेले विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

सोलापूर येथील या नोडल सेंटरमध्ये सुमारे २५० विद्यार्थी सहभागी होणार असून, विविध क्षेत्रातील नवोपक्रमक, उद्योजकतेकडे वाटचाल करणारे विद्यार्थी व तज्ज्ञ यांचा सहभाग राहणार आहे. विद्यार्थ्यांसोबत प्राध्यापक मार्गदर्शकही उपस्थित राहून त्यांना मार्गदर्शन करतील.

या वर्षी जम्मू-काश्मीर, ईशान्य भारत तसेच टियर-२ व टियर-३ शहरांमध्ये बूटकॅम्पचे आयोजन केले जात आहे. बूटकॅम्पचे उद्घाटन ६ एप्रिल रोजी AICTE मुख्यालय, नवी दिल्ली येथून प्रा. योगेश सिंह (अध्यक्ष, AICTE) यांच्या हस्ते, सदस्य सचिव डॉ. श्यामा राठ यांच्या उपस्थितीत आभासी माध्यमातून होणार आहे. तसेच सोलापुरात स्थानिक स्तरावर लक्ष्मी हायड्रॉलिक्स कंपनीचे चेअरमन  निरंजन सिंघवी व सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या बूटकॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समस्यांवर आधारित कार्यशाळा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, स्टार्टअप संस्थापकांचे सत्र आणि टीमवर्कच्या माध्यमातून नवकल्पनात्मक दृष्टिकोन विकसित करण्याची संधी मिळणार आहे.

याशिवाय चौथ्या दिवशी स्थानिक इनोव्हेशन इकोसिस्टम व सांस्कृतिक स्थळांना भेट देण्यात येणार असून, पाचव्या दिवशी अनुदान, फंडिंग संधी व बौद्धिक संपदा हक्क (IPR) यावर विशेष सत्र आयोजित करण्यात येणार आहे. अंतिम दिवशी पिचिंग सत्र होऊन प्रत्येक ठिकाणी सर्वोत्तम ५ संघांना प्रमाणपत्रे व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात येतील.

पहिल्या दोन आवृत्त्यांमध्ये देशभरातील ४६ ठिकाणी १०,००० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून अनेकांनी स्टार्टअप सुरू करून विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी केली आहे.
या उपक्रमामुळे सहभागी विद्यार्थ्यांना वास्तव जीवनातील समस्यांवर अभिनव उपाय विकसित करण्याची संधी मिळणार असून, भारतातील नवोन्मेष परिसंस्थेला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

यावेळी कार्यक्रम समन्वयक प्रा. सुनिल शाखापुरे, डॉ. मुदस्सर नाईकवाडी, प्रबंधक डॉ. डी. आय. नवले आणि जनसंपर्क अधिकारी रामकृष्ण लांबतुरे उपस्थित होते.


चौकट-
✓ बूटकॅम्प दरम्यान प्रमुख उपक्रम :

• नामांकित तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर सत्र
• नवोपक्रम व डिझाईन थिंकिंगवरील प्रत्यक्ष कार्यशाळा
• आयडिया जनरेशन व समस्या सोडविण्याच्या कृती
• स्टार्टअप संकल्पनांसाठी मेंटरिंग सत्र
• इन्क्युबेशन सेंटर भेट व स्टार्टअप्सशी संवाद
• आयडिया पिचिंग व मूल्यांकन प्रक्रिया

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages