“एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी” या घोषवाक्याची सुरुवात स्वतःपासून करा- डॉ. संतोष नवले
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- "आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. विज्ञानाच्या प्रगतीची जोड देऊन आपण निरोगी भविष्याकडे वाटचाल करू शकतो, मात्र 'एकत्रित प्रयत्न आरोग्यदायी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी' या यंदाच्या ब्रीदवाक्याची अंमलबजावणी प्रत्येकाने स्वतःपासूनच सुरू करावी," असे प्रतिपादन सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केले.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त आज सोलापूर जिल्हा रुग्णालय येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ वर्षा डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची उद्घाटन डॉ. संतोष नवले यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. त्यांनी उपस्थितांना उत्तम आरोग्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.
७ एप्रिलचे महत्त्व आणि वर्षभराचे नियोजन:
७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) स्थापना झाली, त्या स्मरणार्थ हा दिवस जगभरात साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून यंदाच्या घोषवाक्यावर आधारित विविध आरोग्य सेवा आणि जनजागृतीपर कार्यक्रम आजपासून सुरू होऊन ६ एप्रिल २०२७ पर्यंत संपूर्ण वर्षभर राबविले जाणार असल्याचे डॉ. नवले यांनी यावेळी सांगितले. त्यांनी यावेळी सर्व उपस्थितांना आरोग्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
पथनाट्यातून व्यसनमुक्तीचा संदेश:
कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे पंडित दीनदयाळ दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रभावी पथनाट्य. या माध्यमातून त्यांनी तंबाखू, धूम्रपान आणि इतर व्यसनांचे दुष्परिणाम मांडून उपस्थितांमध्ये मोठी जनजागृती केली.
उपस्थिती:
या सोहळ्यास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्यासह अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. क्षीरसागर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. पी. कुलकर्णी, दंत वैद्यकीय अधिकारी डॉ. वायचळ, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीमती वैशाली थोरात, पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ काशेट्टी मीना,डॉ.दळवी जिल्हा सल्लागार NTCP,डॉ.ऐश्वर्या सातपुते NCD समन्वयक,डॉ.पल्लवी अंबुरे दंत शल्यचिकीत्सक, श्रीमती बेले सहाय्यक अधिपरिचारिका, डॉ.सुवर्णा राठोड दंत शल्यचिकीत्सक, डॉ.पूजा राठोड DEIC Manager,श्रीमती शोभा माने IPHS समन्वयक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment