ओळखपत्र मागितल्याने उत्पादन शुल्क अधिकाऱ्याचे धाबेवाल्याला मारहाण
माढा (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी आणि एका धाबेवाल्यामध्ये झालेल्या वादातून थेट हाणामारी झाली.
या घटनेत दोन्ही बाजूंचे लोक जखमी झाले असून परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. नंतर गैरसमजुतीतून ही मारामारी झाल्याची माहिती समोर आली.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी मुंबई पासिंगची इनोव्हा गाडी घेऊन परिसरात फिरत होते. त्यांनी एका हॉटेल चालकाकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित धाबेवाल्याने त्यांना ओळखपत्र विचारल्याने वादाची ठिणगी पडली आणि प्रकरण हातघाईवर आलं.
ओळखपत्रावरून वाद, मारहाणीपर्यंत प्रकरण
धाबेवाल्याने अधिकाऱ्यांना ओळखपत्र दाखवण्याची मागणी केली. मात्र यावरून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी धाबेवाल्याला मारहाण केल्याचा आरोप आहे.
ग्रामस्थांचा संताप, अधिकाऱ्यांनाही चोप
या प्रकारानंतर घटनास्थळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले. उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी धाबेवाल्याला मारहाण केल्याचं पाहिल्यानंतर ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलाच चोप दिला. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आणि दोन्ही बाजूंमध्ये जोरदार हाणामारी झाली.
दोन्ही बाजूंचे जखमी रुग्णालयात
या घटनेत धाबेवाल्यासह उत्पादन शुल्क विभागाचे काही कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने माढा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून नेमका प्रकार कसा घडला याची चौकशी केली जात आहे.

No comments:
Post a Comment