सोलापूर (कटूसत्य वृत्त) : शहरातील बाळे, शिवाजी नगर, बुधवार पेठ या भागांत मूलभूत नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. नळांच्या तोट्या गायब असल्याने पाण्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत असून हेच पाणी ड्रेनेजमध्ये जाऊन घरात शिरत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. याशिवाय विभागीय कार्यालयातील अधिकारी फोन उचलत नसल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे.
महापालिकेच्या दत्त चौक येथील विभागीय कार्यालय क्र. १ मध्ये गुरुवारी नागरी समस्यांवर बैठक घेण्यात आली. यावेळी विविध पक्षांच्या नगरसेवकांनी नागरिकांच्या तक्रारींचा पाढा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासमोर मांडला.
नगरसेवकांनी सांगितले की, बाळे परिसरात नळांच्या तोट्या नसल्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहते व मोठ्या प्रमाणावर नासाडी होते. तसेच ड्रेनेज लाईन खराब झाल्याने सांडपाणी घरात शिरण्याचे प्रकार वाढले आहेत. दुरुस्तीसाठी कर्मचारी वेळेवर येत नसल्याचीही तक्रार करण्यात आली.
संतोष नगर भागात ड्रेनेज चेंबरमध्ये गाळ साचल्याची समस्या गंभीर असून, त्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. पाण्याची नासाडी रोखण्यासाठी “एक घर-एक नळ” योजना तातडीने लागू करावी, तसेच आरोग्य निरीक्षकांनी यावर लक्ष ठेवावे, अशी मागणी करण्यात आली.
आरोग्य विभागावर टीका
आरोग्य निरीक्षक ड्रेनेज साफसफाईच्या तक्रारी गांभीर्याने घेत नाहीत, तसेच विभागीय कार्यालयातील कर्मचारी नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात, अशी तक्रार काही नागरिकांनी बैठकीत केली. संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली.
यावर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी संबंधित विभागांना कामात तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले.
शिवाजी नगरमध्ये पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर
शिवाजी नगर भागात पिण्याच्या पाण्याची पाइपलाइनच नसल्याचे समोर आले. जिथे पाइपलाइन आहे, तिथेही अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे तातडीने लक्ष न दिल्यास नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा नगरसेवकांनी दिला.
.png)
No comments:
Post a Comment