पाणीपुरवठ्यासाठी ६४ लाखांच्या तुरटी खरेदीला स्थायी समितीची मंजुरी**
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रांसाठी आवश्यक असलेल्या तुरटी खरेदी प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. सुमारे ६४ लाख रुपयांच्या या प्रस्तावावर गुरुवारी झालेल्या बैठकीत चर्चा होऊन अंतिम मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाकडून पाकणी, सोरेगाव आणि भवानी पेठ येथील जलशुद्धीकरण केंद्रांसाठी वर्षभरासाठी ७०० मेट्रिक टन तुरटी खरेदी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या खरेदीसाठी अंदाजित खर्च ७९ लाख ८८ हजार २७४ रुपये इतका होता, तर निविदेनुसार ६३ लाख ३९ हजार ९०० रुपयांची सर्वात कमी बोली प्राप्त झाली.
महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनीने प्रतिटन दरात सुमारे ५०० रुपयांनी कमी दर देत सर्वात कमी निविदा सादर केली. या दरात लोडिंग, अनलोडिंग, वाहतूक आणि तीनही केंद्रांपर्यंत पुरवठा यांचा समावेश असल्याने संबंधित कंपनीकडून खरेदी करण्यास समितीने मंजुरी दिली. तसेच करारपत्र करून कार्यारंभ आदेश देण्यासही मान्यता देण्यात आली.
दरम्यान, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. झोन क्रमांक १ व २ मधील विविध १० ठिकाणी असलेले हातपंप काढून त्या ठिकाणी विंधन विहिरींवर इलेक्ट्रिक पंपसेट बसविण्याच्या ६ लाख ७२ हजार ५२० रुपयांच्या प्रस्तावालाही हिरवा कंदील देण्यात आला.
हे काम गुरुकृपा इलेक्ट्रिकल अँड रिवाइंडिंग वर्क्स यांना देण्यास मान्यता देण्यात आली असून, त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यास मदत होणार आहे.
.png)
No comments:
Post a Comment