मोहोळ स्टेशनला हुतात्मा व इंटरसिटीचा थांबा द्या - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, April 4, 2026

मोहोळ स्टेशनला हुतात्मा व इंटरसिटीचा थांबा द्या

 मोहोळ स्टेशनला हुतात्मा व इंटरसिटीचा थांबा द्या

पोखरापूर (कटूसत्य वृत्त):- मोहोळ रेल्वे स्थानकावर हुतात्मा एक्स्प्रेस, सोलापूर–पुणे इंटरसिटी आणि कन्याकुमारी एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा देण्यात यावा तसेच पूर्वीप्रमाणे तिकीट आरक्षणाची सुविधा पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार राजू खरे यांनी केली आहे.

या संदर्भात त्यांनी मध्य रेल्वे, सोलापूरचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मोहोळ तालुक्याची लोकसंख्या सुमारे ३ लाख असून शहरातील बाजारपेठ मोठी आणि विस्तारलेली आहे. तसेच तीन राष्ट्रीय महामार्ग मोहोळमधून जात असल्याने प्रवासाची वर्दळ मोठ्या प्रमाणावर आहे.

चिंचोली व चंद्रमौळी औद्योगिक वसाहतींमुळे कामगार, विद्यार्थी, रुग्ण आणि व्यापाऱ्यांना पुण्याकडे वारंवार प्रवास करावा लागतो. त्यामुळे हुतात्मा एक्स्प्रेस व इंटरसिटी गाड्यांना मोहोळ येथे थांबा मिळाल्यास प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

याशिवाय श्री क्षेत्र वडवळ, श्री क्षेत्र मोहोळ आणि जवळील तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांसाठीही रेल्वे प्रवास अधिक सुलभ होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सध्या मोहोळ रेल्वे स्थानकावर तिकीट आरक्षण सेवा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे तिकीट बुकिंग सेवा तात्काळ सुरू करावी, अशी मागणीही करण्यात आली.

यावेळी ग्रामीण रुग्णालय रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सरफराज सय्यद व सचिन जाधव उपस्थित होते.

चौकट:-
मोहोळ रेल्वे स्थानकावर तिकीट आरक्षण सेवा नसल्याने प्रवाशांना गैरसोय होत आहे. हुतात्मा एक्स्प्रेस, इंटरसिटी व कन्याकुमारी एक्सप्रेसला थांबा मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू असून लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages