पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा जपण्याचे आवाहन- कॉ. अशोक ढवळे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 16, 2026

पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा जपण्याचे आवाहन- कॉ. अशोक ढवळे

 पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा जपण्याचे आवाहन- कॉ. अशोक ढवळे




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची समृद्ध परंपरा लाभलेली असून, या परंपरेतूनच सर्वसामान्य नागरिकांना संविधानिक अधिकार प्राप्त झाले आहेत, असे प्रतिपादन कॉ. अशोक ढवळे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर पिडीत, शोषित आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी संघर्ष केला, असे नाही तर त्यांनी शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांनाही प्राधान्य दिले असे त्यांनी अधोरेखित केले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त दत्तनगर येथील पक्ष कार्यालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

पुढे बोलताना कॉ. ढवळे यांनी भारतीय समाजरचनेतील वर्ण, वर्ग आणि जात व्यवस्थेवर सखोल भाष्य केले. “जात म्हणजे बंदिस्त केलेला वर्ग,” असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते, याची आठवण करून देत त्यांनी सांगितले की, जगात मूलतः दोनच वर्ग आहेत – ‘आहेरे’ (श्रीमंत) आणि ‘नाहीरे’ (गरीब). भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटूनही या दोन वर्गांमधील दरी कायम आहे, ही चिंतेची बाब आहे.

इतिहासातील सामाजिक संघर्षांची आठवण करून देताना त्यांनी सांगितले की, १९२७ साली चवदार तळे सत्याग्रह हा समतेचा निर्णायक लढा होता. त्याआधी १८६८ मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या वाड्यातील पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला करून सामाजिक समतेचा संदेश दिला. डिसेंबर १९२७ मध्ये मनुस्मृतीचे दहन करण्यात आले, तर २ मार्च १९३० रोजी नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू झाला, जो तब्बल साडेपाच वर्षे चालला.

१९३५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेच्या अधिकारासाठी धर्मांतर करणार असल्याची घोषणा केली आणि अखेर १९५६ मध्ये नागपूरच्या दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.एम. एच. शेख यांनी केले, तर वक्त्यांचा परिचय कॉ .दत्ता चव्हाण यांनी करून दिला. सूत्रसंचालन ॲड. अनिल वासम यांनी केले.

या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉ. नरसय्या आडम यांनी केला. आपल्या समारोपात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आदर्श समाजनिर्मितीसाठी मार्गदर्शक असून ते प्रत्यक्ष आचरणात आणणे आवश्यक असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. युसुफ शेख मेजर, नसीमा शेख, व्यंकटेश कोंगारी, म. हनीफ सातखेड, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, रंगप्पा मरेड्डी, प्रा. अब्राहम कुमार आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे तांत्रिक संयोजन बालकृष्ण मल्याळ यांनी केले.
 

चौकट 
भोंदूपणाला साधुत्वाचा मुलामा – पुरोगामी महाराष्ट्रासाठी धोकादायक

महाराष्ट्र ही संत आणि समाजसुधारकांची भूमी असताना, आज काही भोंदू प्रवृत्तीच्या व्यक्तींना ‘साधू’ म्हणून गौरवले जात आहे, ही चिंताजनक बाब असल्याची टीका कॉ. ढवळे यांनी केली. अशा प्रवृत्तींमुळे पुरोगामी विचारसरणीला धक्का बसत असून, समाजाने विवेकवादी भूमिका घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages