सोलापुरात पाणी निचरा ते कचरा व्यवस्थापन – आयुक्त ओंबासे यांचा आढावा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि नागरिकांना होणाऱ्या अडचणी कमी करण्याच्या दृष्टीने सोलापूर महानगरपालिकेच्या विविध कामांची आयुक्त सचिन ओंबासे यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
नाना-नानी पार्क परिसरात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याच्या समस्येवर उपाययोजना म्हणून पार्कमधून सोमपा परिवहन विभागालगत असलेल्या नाल्यात पाणी सोडण्यासाठी मिनी कॅनल (कालवा) तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून पार्कसमोरील साचलेले पाणी थेट नाल्यात सोडले जाणार असून उद्यानात पाणी साचून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास टाळण्यावर भर देण्यात आला आहे. यावेळी पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होईल आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच लगतच्या टेनिस कोर्टची पाहणी केली .पार्कमधील आकांक्षी शौचालयाचीही पाहणी करून पाण्याची कमतरता भासू नये यासाठी स्वतंत्र बोअरवेल उभारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
त्यानंतर आयुक्तांनी इंद्रधनु सोसायटी परिसरातील कचरा ट्रान्सफर प्रकल्पाची पाहणी केली. यापूर्वी देगाव, दमानी नगर, थोबडे वस्ती व परिसरातील कचरा उघड्या रॅम्पवरून छोट्या वाहनांमधून मोठ्या आरसी गाडीत टाकताना कचरा उडून परिसरात पसरण्याची समस्या निर्माण होत होती. या पार्श्वभूमीवर आता त्या ठिकाणी संरक्षित मोठा हॉल उभारण्यात आला असून त्यामुळे कचरा इतरत्र न पसरता योग्य पद्धतीने संकलित व वाहतूक करता येणार आहे. या कामाबाबतही आयुक्तांनी समाधान व्यक्त करत पुढील आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.
याच अनुषंगाने तुळजापूर रोड येथील बायो एनर्जी प्लांटचीही आयुक्तांनी पाहणी केली. या प्लांटमध्ये कचऱ्याचा पुनर्वापर करून ऊर्जा निर्मिती केली जात असली तरी उर्वरित कचऱ्याचे ढीग बाहेर मोठ्या प्रमाणात साचत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा कचरा इतरत्र न पसरता त्याची योग्य विल्हेवाट लावावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच कचरा डेपो परिसरातील रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्याचेही निर्देश देण्यात आले.
या पाहणी दौऱ्यावेळी सहायक आयुक्त शशिकांत भोसले,मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे, विभागीय अधिकारी राघवेंद्र गायधनकर, कनिष्ठ अभियंता लायका मनगोळी, चेतन प्रचंडे, उद्यान अधीक्षक कोमल काशिद, प्र. उद्यान अधीक्षक स्वप्नील सोलंकर, उद्यान सुपरवायझर सुहास शिंदे, सहाय्यक निरीक्षक दारफळे, मुख्य आरोग्य निरीक्षक नल्ला बंधू यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment