४२९ शाळांची पटपडताळणी; ९६.५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंद
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद सोलापूरच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत आज जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शाळांची प्रत्यक्ष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेच्या पहिल्या दिवसात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेण्यात आला असता, एकूण उपस्थिती ९६.५० टक्के इतकी समाधानकारक असल्याचे समोर आले.
पट पडताळणी मोहिमेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील एकूण ४२९ शाळांची तपासणी करण्यात आली. या शाळांमध्ये एकूण ७३ हजार १४१ पटसंख्या नोंदविण्यात आली असून, त्यापैकी ७० हजार ५८० विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित होते. तर २ हजार ५६१ विद्यार्थी अनुपस्थित असल्याचे आढळले. तालुकानिहाय पाहता माढा तालुक्यात सर्वाधिक ९९.४४ टक्के उपस्थिती नोंदली गेली असून, मोहोळ तालुकाही ९९.५३ टक्क्यांसह आघाडीवर राहिला. बार्शी, माळशिरस, मंगळवेढा या तालुक्यांनीही ९८ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नोंदवत चांगली कामगिरी केली. करमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांमध्येही उपस्थितीचा टक्का ९७ च्या पुढे राहिला.
याउलट अक्कलकोट (९५.१७ टक्के) आणि उत्तर सोलापूर (९६.८४ टक्के) येथे तुलनेने कमी उपस्थिती दिसून आली. विशेषतः मनपा सोलापूर क्षेत्रात केवळ ९२.४७ टक्के उपस्थिती नोंदली गेली असून, हे प्रमाण जिल्ह्यात सर्वात कमी आहे. त्यामुळे शहरी भागात विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
या पटपडताळणी मोहिमेमुळे शाळांमधील वास्तविक उपस्थितीचे चित्र स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद समाधानकारक असल्याचे दिसून येत असताना, काही भागात अजूनही सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. आगामी काळात शंभर टक्के उपस्थितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षक, पालक आणि प्रशासन यांच्यात अधिक समन्वय वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
एकूण : शाळा - ४२९ | पटसंख्या - ७३१४१ | उपस्थित - ७०५८० | अनुपस्थित - २५६१ | टक्केवारी - ९६.

No comments:
Post a Comment