टेंभुर्णीत पोलिसांचा रूट मार्च; दंगा काबू योजनेची रंगीत तालीम
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- आगामी सण, उत्सव व महापुरुषांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या वतीने रविवारी शहरात रूट मार्च काढण्यात आला. याचबरोबर दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेऊन पोलिसांनी आपली तयारी दर्शविली.
टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परी. सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत टेंभुर्णी शहरातील मुख्य रस्ते व मध्यवर्ती भागातून पोलीस अधिकारी, अंमलदार व होमगार्ड यांच्या उपस्थितीत शिस्तबद्ध रूट मार्च पार पडला. सरकारी वाहनांच्या ताफ्यासह झालेल्या या मार्चमुळे शहरात पोलिसांची ठोस उपस्थिती जाणवली.
यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. यामध्ये लाठी, हेल्मेट, ढाल, गॅस गन, रायफल आदी साहित्यांसह पोलिसांनी प्रात्यक्षिक सादर करून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले.
त्यानंतर मोडनिंब शहरातही मुख्य रस्ते व मध्यवर्ती भागातून रूट मार्च काढण्यात आला. या उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करत, कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला.
या रूट मार्च व रंगीत तालीमीत पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने, टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तसेच माढा पथकाचे होमगार्ड सहभागी झाले होते.

No comments:
Post a Comment