निरा व राजेवाडीचे पाणी तातडीने सोडा; आमदार देशमुखांचा अधिकाऱ्यांना इशारा
सांगोला (कटूसत्य वृत्त):- वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर उन्हाळी पिकांसाठी पाण्याची गरज तीव्र झाली असताना राजेवाडी तलाव व निरा उजवा कालव्याच्या वितरिकांमधून तातडीने पाणी सोडण्याचे निर्देश आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
राजेवाडी तलाव व निरा उजवा कालव्याच्या काही वितरिकांमधून अद्याप पाणी सोडले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर आमदार देशमुख यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीस निरा उजवा कालवा विभाग, फलटण येथील कार्यकारी अभियंता मोरे तसेच पंढरपूर पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र घोत्रे उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार देशमुख यांनी टेल एंड भागातील शेतकऱ्यांना नेहमीच पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले. कालव्यांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करून पाण्याची गळती व अपव्यय रोखावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच निरा उजवा व म्हसवड तलावातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या काही वितरिकांमध्ये पाणी न सोडल्याने पिकांना फटका बसत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
माण, आटपाडी, सांगोला व माळशिरस तालुक्यातील शेतकरी या वितरिकांवर अवलंबून असल्याने पाणी सोडण्याची मागणी त्यांनी आमदारांकडे केली होती. त्यानुसार ही बैठक घेण्यात आली.
बैठकीत समन्यायी पाणी वाटप, अनधिकृत पाणी उपसा रोखणे तसेच दुरुस्तीमुळे होणारा विलंब टाळणे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरच पाणी सोडण्याचे आश्वासन दिले असून त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
.png)
No comments:
Post a Comment